पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर रवाना

नवी दिल्ली – क्वॉड परिषदेच्या बैठकीबरोबर संयुक्त राष्ट्राच्या महासभेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अमेरिकेला रवाना झाले. या दौऱ्यादरम्यान ते अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय समुदायाच्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत. तसेच उच्च तंत्रज्ञानाशी संबंधित उद्योजकांशीही वार्तालाप करणार आहेत. अमेरिकेला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामध्ये आपल्या दौऱ्यातील महत्वाच्या कार्यक्रमांविषयीची माहीती दिली आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी विल्मिंग्टन या त्यांच्या मूळ शहरात आयोजित केलेल्या क्वाड शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी आणि न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या बैठकीत समिट ऑफ द फ्युचर ला संबोधित करण्यासाठी तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आपण रवाना होत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान ऍन्थनी अल्बानीज आणि जपानचे फुमिओ पंतप्रधान किशिदा यांच्यासोबत क्वाड शिखर परिषदेत मोदी सहभागी होणार आहेत. हिंद- प्रशांत क्षेत्रात शांतता, प्रगती आणि समृद्धीसाठी कार्य करण्यासाठी समविचारी देशांचा प्रमुख गट म्हणून हा मंच उदयाला आला आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांच्यासोबतची मोदींची भेट भारत-अमेरिका सर्वसमावेशक जागतिक धोरणात्मक भागीदारी आमच्यादोन्ही देशांमधील जनतेच्या फायद्यासाठी आणि जागतिक कल्याणासाठी अधिक दृढ करण्याच्या नव्या मार्गांचा आढावा घेण्याची संधी असेल, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.
संयुक्त रा,ट्राच्या महासभेमध्ये आयोजित समिट ऑफ द फ्युचर या परिसंवादामध्ये मोदींचे बाषण होणार आहे. हे व्यासपीठ म्हणजे जागतिक समुदायासाठी मानवतेच्या कल्याणाची भविष्यातील वाटचाल निर्धारित करण्याची एक संधी आहे. जागतिक लोकसंख्येचा सहावा भाग असलेल्या आपल्या लोकसंख्येचा शांततामय आणि सुरक्षित भविष्यावर सर्वात जास्त अधिकार असल्याने त्यांच्या वतीने आपण त्यांचे विचार सामाईक करणार असल्याचे देखील मोदींनी म्हटले आहे.





