पुणे – करोना बाधितांवर उपचारांसाठी रुग्णालयांनी आकारण्याचे दरपत्रक शासनाने यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यामुळे कुठल्याही रुग्णालयाने त्याहून जादा दर आकारू नये. तसे आढळताच संबंधितांवर आणि औषधांचाही काळाबाजार करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.
विधानभवन सभागृहात शुक्रवारी उपमुख्यमंत्री पवार यांनी पुणे, पिंपरी चिंचवड महानगरासह जिल्हयातील करोना परिस्थितीचा आणि उपाययोजनांचा आढावा घेतला. याबैठकीस लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पवार म्हणाले, करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने “माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम सुरू केली आहे. यामुळे करोनाचे पूर्वनिदान होण्यास मदत होणार आहे, यातून रुग्णाला वेळेपूर्वीच उपचार मिळतील व रुग्ण लवकर बरा होईल. त्यामुळे ही मोहीम प्रभावीपणे राबवा, असे आदेशही त्यांनी दिले. करोनामुक्त झालेल्यांनी इतर आवश्यक उपचारांबाबतही दक्षता घेण्याच्या सूचना करून पवार म्हणाले, करोनाबाधितांची वाढती संख्या विचारात घेत उपचारासाठीच्या सुविधांही सातत्याने वाढवण्यात येत आहेत. संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनीही जबाबदारी ओळखून मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व स्वच्छता या त्रिसूत्रीचा अवलंब करावा. करोना कुणीही सहजपणे घेऊ नये.
या बैठकीला राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार माधुरी मिसाळ, चेतन तुपे, सुनिल शेळके, सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शांतनू गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, डॉ. सुभाष साळुंखे, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
करोना बाधितांवर उपचारांसाठी पुणे महानगरपालिकाही सातत्याने उपचार सुविधांमध्ये वाढ करते आहे. जम्बो रुग्णांलयामध्येही उपचार सुविधा वाढवण्यात आल्या आहेत.
– मुरलीधर मोहोळ, महापौर