satara | मुद्रणालयातील कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन

वाई, (प्रतिनिधी) – येथील राज्य सरकारच्या मुद्रणालयातील कर्मचाऱ्यांनी आज विविध मागण्यांसाठी काळ्या फिती लावून आंदोलन केले. मुख्यमंत्र्यांनी या आंदोलनाची योग्य दखल घेऊन प्रश्न सोडवावेत अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र गव्हर्नमेंट एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने आज देण्यात आला.
राज्य सरकारच्या उद्योग विभागाच्या अखत्यारीत मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर आणि वाई येथील नऊ मुद्रणालये असून शासनाची सर्व महत्त्वाची छपाई कामे अहोरात्र सुरू असतात. या मुद्रणालयाच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारले होते.
या मुद्रणालयांचा पुनर्विकास करण्याची योजना आहे, पण पुनर्विकास करण्यापूर्वी कामगार संघटनांना विश्वासात घेण्याची कामगार संघटनांची प्रमुख मागणी आहे. त्याशिवाय रिक्त पदे, आरोग्याचे प्रश्न, यंत्रसामुग्री अशा विविध मागण्यांसाठी संघटनेच्या वतीने आज वाई येथील शासकीय मुद्रणालयाच्या बाहेर कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले.
या आंदोलनाची योग्य दखल घेऊन उद्योगमंत्र्यांनी त्वरित बैठक बोलावून प्रश्न सोडवावेत अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे नेते अध्यक्ष सागर राणे, फेडरेशन प्रतिनिधी सुदन कांबळे सरचिटणीस संजय जाधव, शंकर इथापे व इतर कर्मचारी उपस्थित होते.





