बलाढ्य देशांचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प – शी जिनपिंग तब्बल चार वर्षांनी समोरासमोर भेटणार; ‘या’ मुद्द्यांवर होणार चर्चा

वॉशिंग्टन/बीजिंग: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची तब्बल चार वर्षांनंतर पहिली भेट गुरुवारी (दि. २०) होत आहे. वाढलेला तणाव आणि अनेक वादग्रस्त मुद्दे या पार्श्वभूमीवर या भेटीला आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे. व्यापार, तंत्रज्ञान, रेअर अर्थ आणि फेंटेनाइलसारख्या गंभीर विषयांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र, ‘पेच’ अद्यापही कायम असून, या भेटीतून ठोस तोडगा निघणार की संबंध आणखी बिघडणार, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.
चर्चेच्या केंद्रस्थानी काय?
रेअर अर्थ धातू आणि व्यापार: चीनचा रेअर अर्थ धातूंवर असलेला दबदबा आणि त्यांनी निर्यात निर्बंध लादल्यामुळे ट्रम्प यांनी सर्व चिनी वस्तूंवर १००% कर (टॅक्स) लावण्याची धमकी दिली होती. यावर ‘समझोता’ होण्याची आशा ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे.
फेंटेनाइल आणि टॅरिफ वॉर: अमेरिकेत पसरलेल्या फेंटेनाइल (घातक मादक पदार्थ) समस्येवरून ट्रम्प यांनी चीनवर २०% टॅरिफ लावले आहेत. चीनच्या प्रत्युत्तरात सोयाबीनसह कृषी उत्पादनांवर टॅक्स लावण्यात आले होते. यावर तोडगा निघून चीनने सोयाबीनची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्याची तयारी दर्शवल्याचा दावा अमेरिकेने केला आहे.
युक्रेन युद्ध आणि रशिया: रशियाकडून तेल खरेदी कमी करण्यासाठी अमेरिका चीनवर दबाव आणू इच्छितो. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी ट्रम्प यांना जिनपिंगवर दबाव आणण्याचे आवाहन केले आहे.
तैवानचा मुद्दा: चीन तैवानला आपला भूभाग मानतो, तर अमेरिका तैवानला आत्मसंरक्षणासाठी शस्त्रे पुरवतो. हा संवेदनशील मुद्दाही चर्चेत येण्याची शक्यता आहे.
तंत्रज्ञान आणि टिकटॉकचे भविष्य: AI आणि चिप्सच्या स्पर्धेवर चर्चा अपेक्षित आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, टिकटॉकच्या अमेरिकेतील मालकी बदलाचा सौदा जिनपिंग यांच्या उपस्थितीत पूर्ण होऊ शकतो.
‘टेक्नॉलॉजी वॉर’ आणि टिकटॉकचा तिढा-
चीन आपल्या चिप उद्योगाला बळकट करत असताना, अमेरिकेच्या चिप कंपन्यांचे (उदा. Nvidia) चीनमधील विक्रीवर बंदी आल्यास सिलिकॉन व्हॅलीची वाढ धोक्यात येईल, अशी भीती व्यक्त होत आहे. टिकटॉकच्या मालकीबाबत अमेरिकेने दिलेल्या मंजुरीनुसार, हा सौदा गुरुवारी पूर्ण होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे चिनी कंपनी ByteDance कडून नियंत्रण अमेरिकन गुंतवणूकदारांकडे जाईल.
भविष्यातील संबंधांची दिशा ठरणार!
ट्रम्प यांच्या दुसऱ्या सत्ताकाळात दोन्ही देशांतील संबंध अनेक आघाड्यांवर बिघडले आहेत. विशेषत: व्यापार आणि जागतिक प्रभावावरून दोन्ही महासत्तांमध्ये तीव्र स्पर्धा आहे. विशेषज्ञांच्या मते, ही भेट ‘विस्कटलेल्या’ संबंधांना नवी दिशा देईल की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.





