पुणे – पारंपरिक उत्साहाचा व भक्तीचा त्रिवेणी संगम साधत, ‘तोरण क्लासिक सोसायटी गृहरचना संस्थे’मध्ये बुधवारची तुळशी विवाह सोहळा अत्यंत मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्याचे पौरोहित्य उल्हास जोशी गुरुजी वेल्हे (राजगडकर) यांनी केले. गुरुजींच्या ओजस्वी मंत्रोच्चारात, पारंपरिक पद्धतीने हा विवाह विधी पार पडला. सालाबादप्रमाणे यंदाही सोसायटीच्या सुमारे ७० ते ८० सभासद व परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याची शोभा वाढवली. भाविकांचा उत्साह शिगेला तुळशी वृंदावनाला साडी नेसवून, आकर्षक फुलांनी सजवण्यात आले होते. तर, विष्णूच्या प्रतिमेला वधू-वराचा साज चढवण्यात आला होता. मंगलाष्टकांच्या वेळी भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. यावेळी उपस्थितांनी वधू-वरांवर अक्षतांचा वर्षाव केला आणि सोसायटीतील महिलांनी खास पारंपरिक वेशभूषा करून या सांस्कृतिक कार्यक्रमात रंगत आणली, ज्यामुळे सोसायटीचे वातावरण एखाद्या लग्नघरासारखे प्रसन्न झाले होते. सामाजिक एकोप्याचे दर्शन हा केवळ धार्मिक विधी नसून, सोसायटीतील सदस्यांमध्ये सलोखा आणि सामाजिक एकोपा वाढवणारा एक महत्त्वाचा कार्यक्रम ठरला. तरुण-वृद्धांनी एकत्र येऊन केलेल्या नियोजनामुळे हा सोहळा अत्यंत यशस्वी झाला. उल्हास जोशी गुरुजी यांनी तुळशी विवाहाचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले, “तुळशी विवाह म्हणजे संस्कृतीचे आणि निसर्गाचे महत्त्व जपणारा सोहळा आहे. हा उत्साह पाहून आपले धार्मिक संस्कार टिकून राहतील यात शंका नाही.” कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. ‘तोरण क्लासिक सोसायटी’ने वेल्हे परिसरात आपल्या उत्कृष्ट आयोजनाची आणि सांस्कृतिक निष्ठा जपल्याची एक नवी ओळख निर्माण केली आहे.