Pune District : वीसगावच्या जेधेवाडी शिवारात रानगव्यांचा वावर
Pune District : अचानक रानगवे दिसल्याने शेतकरी भीतीपोटी शेती काम सोडून घराकडे पळाला. त्याची माहिती इतर शेतकऱ्यांना देत रानगव्यापासून सावध राहण्याचे शेतकऱ्यांना सांगितले.

खानापूर : यंदा दुष्काळामुळे खरीप पूर्ण वाया गेला असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. दरम्यान वीसगाव खोऱ्यातील जेधेवाडी (खानापूर, ता. भोर) शिवारात फिरू लागलेले रानगवे उर्वरित पिकांची नासाडी करू लागल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला असून रानगव्यांच्या भीतीच्या छायेखाली आहे.
सध्या भोर तालुक्यातील जंगल परिसरात पाण्याचे स्त्रोत आटल्याने वन्यप्राणी मानवी वस्तीकडे धाव घेत असले तरी तालुक्यातील जंगल परिसरात रानगवे यांचा वावर मागील काळात कधी नव्हता. अचानक दोन दिवसांपूर्वी एका शेतकऱ्याला सकाळी शेतात काम करताना जेधेवाडी (खानापूर) येथील शेती शिवारात डोंगराच्या बाजूला दोन रानगवे जाताना निदर्शनास आले. अचानक रानगवे दिसल्याने शेतकरी भीतीपोटी शेती काम सोडून घराकडे पळाला. त्याची माहिती इतर शेतकऱ्यांना देत रानगव्यापासून सावध राहण्याचे शेतकऱ्यांना सांगितले.
मागील महिनाभरात अनेक शेतकरी डोंगररांगांच्या जवळील शेती परिसरात पहाटे पाळीव जनावरे चारण्यासाठी जात होते. मात्र शिवाराच्या बाजूला रानगवा आल्याचे समजल्यापासून शेतकऱ्यांनी दोन ते तीन दिवसांपासून पहाटेच्या वेळी जनावरे चारण्याचे बंद केले आहे. तर, शेतात काम करण्यासाठी जाणारे शेतकऱ्यांनी रानगव्याच्या भीतीने शेताकडे जाणे टाळले आहे, असे जेथेवाडी येथील शेतकरी रोहिदास जेधे यांनी सांगितले.
शेती पिकांचे नुकसान
दुष्काळातून बचावलेली भातशेतीत रानगवे नाचून हैदोस घालत असल्याने पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. एकीकडे शेतकरी दुष्काळामुळे अडचणीत सापडला आहे तर दुसरीकडे वन्य प्राण्यांच्या हायदोसामुळे उर्वरित पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांपुढे दुहेरी संकट उभे ठाकले आहे. वनविभागाने रानगवे यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.





