आग प्रवण क्षेत्राचे नकाशे तयार करणार

पुणे– वनक्षेत्रातील आगीच्या घटनांचा वाढता धोका आणि अशा जंगलांना लागलेल्या आगीमुळे होणारे मोठे नुकसान लक्षात घेऊन वनविभागाने जंगलात आग लागण्याची शक्यता असलेल्या भागांचा नकाशा तयार करण्याची योजना आखली आहे. विभागाने आपल्या 10 वर्षांच्या तपशीलवार प्रकल्प अहवालात (डीपीआर) अशा काही बाबींवर लक्ष केंद्रीत केले असून, त्यामध्ये या आगींच्या विषयाचा समावेश केला आहे. याबाबतचा प्रस्ताव मुख्य कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती पुणे वनविभागातील वरिष्ठ वन अधिकाऱ्यांनी दिली.
जंगलात आग लागण्याचे प्रकार वारंवार होत आहेत. वन्यजीवांसाठी, विशेषत: पक्षी आणि सरपटणारे प्राणी यांना या आगीपासून मोठा धोका आहे. पुणे वनविभागाच्या अंतर्गत येणाऱ्या वनक्षेत्रात दरवर्षी आगीच्या असंख्य घटना घडत असतात. डीपीआरनुसार, गेल्या वर्षभरात विभागामध्ये विविध ठिकाणी 65 अशा प्रकारच्या घटनांची नोंद करण्यात आली असून, त्यामुळे 212.51 हेक्टर क्षेत्र जळून खाक झाले आहे.
वन विभागाने काही अप्रत्यक्ष प्रतिबंधात्मक उपाय देखील प्रस्तावित केले आहेत. आगीच्या हंगामात लहान वन उत्पादन विशेषतः मध गोळा करण्यापासून प्रतिबंधित करणे प्रस्तावित आहे. त्याशिवाय, कार्यशाळा, बैठका, पोस्टर्स, हॅंडआउट्स, बोर्ड आणि लघुपटांसारख्या इतर माध्यमांद्वारे जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात यावेत, असाही प्रस्ताव आहे. जंगलातील आग शोधण्यासाठी फायर लाईन्स आणि वॉच टॉवर्सचे चांगले नेटवर्क स्थापित करणे.
दळणवळण यंत्रणा बळकट करणे आणि सक्षम गस्त घालणे हे देखील या प्रस्तावित प्रतिबंधात्मक उपक्रमांचा एक भाग आहेत, असे मोहिते म्हणाले. हा प्रस्ताव सध्या नागपूर येथील वन विभागाच्या मुख्यालयात मंजुरीसाठी पाठवण्यात आला असून, त्यानंतर टप्प्याटप्प्याने काम केले जाईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.
मागील नोंदींवरून नकाशा बनवणार…
पुणे वनविभागाने, त्यांच्या डीपीआरमध्ये, जंगलातील आगीसाठी काही थेट प्रतिबंधात्मक उपाय सुचवले आहेत. या प्रस्तावातील प्रमुख बाबींमध्ये गेल्या पाच वर्षांचा आगीचा इतिहास आणि ज्वलनशील सामग्रीची उपलब्धता यावर आग प्रवण क्षेत्राचा अंदाज बांधण्यात आला आहे. हा नकाशा मागील नोंदी आणि इतर घटकांच्या आधारे बनवण्यात येईल, अशी माहिती पुणे विभागाचे उपवनसंरक्षक अधिकारी महादेव मोहिते यांनी दिली. तसेच संवेदनशील भागात, विशेषत: वन्यजीवांच्या अधिवासात आग रोखण्यासाठी सज्ज आणि विशेष लक्ष दिले जाईल, असेही मोहिते यांनी नमूद केले.





