Satara: सर्वांगीण विकासासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करा
Satara जिल्हा परिषद सदस्यांसाठी झालेल्या प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन गुरुवारी झाले. त्याप्रसंगी डॉ. प्रिया शिंदे बोलत होत्या. उपाध्यक्ष राजू भोसले, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. ऋतुजा शिंदे, शिक्षण व अर्थ समितीच्या सभापती सौ. तेजस्विनी कदम, कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीच्या सभापती सौ. लता कर्णे, समाजकल्याण समितीचे सभापती हृषीकेश धायगुडे-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले उपस्थित होते.

Satara: जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉ. सौ. प्रिया शिंदे यांनी गुरुवारी केले. ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरील विकासकामांचे नियोजन अधिक प्रभावी, लोकाभिमुख व्हावे, या उद्देशाने जिल्हा परिषदेमार्फत दि. 18 ते 20 या कालावधीत ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद विकास आराखडे तयार करण्याबाबत विशेष प्रशिक्षणाचे आयोजन जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात करण्यात आले आहे.
जिल्हा परिषद सदस्यांसाठी झालेल्या प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन गुरुवारी झाले. त्याप्रसंगी डॉ. प्रिया शिंदे बोलत होत्या. उपाध्यक्ष राजू भोसले, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. ऋतुजा शिंदे, शिक्षण व अर्थ समितीच्या सभापती सौ. तेजस्विनी कदम, कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीच्या सभापती सौ. लता कर्णे, समाजकल्याण समितीचे सभापती हृषीकेश धायगुडे-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले उपस्थित होते.
जिल्हा परिषद सदस्यांना ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद विकास आराखडे तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगण्यात आली. स्थानिक गरजांनुसार विकासकामांचे नियोजन करणे, कामांचे प्राधान्यक्रम निश्चित करणे, उपलब्ध निधी व संसाधनांचा प्रभावी वापर करणे, केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा विकास आराखड्यांमध्ये समावेश करणे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. गावापासून जिल्हा स्तरापर्यंत विकासकामांचे नियोजन शास्त्रशुद्ध, पारदर्शक व परिणामकारक व्हावे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधींना विकास आराखडा तयार करण्याच्या प्रक्रियेची माहिती मिळावी आणि नियोजन प्रक्रियेमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग वाढावा, हा प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे.
‘यशदा’मध्ये प्रशिक्षण घेतलेल्या जिल्हा परिषद कर्मचार्यांनीच जिल्हा परिषद सदस्यांना मार्गदर्शन केले. प्रशिक्षणामध्ये अनुभव, तांत्रिक माहिती आणि नियोजन प्रक्रियेतील बारकावे यांचा समन्वय साधण्यात आला. प्रशिक्षणाबाबत जिल्हा परिषद सदस्यांनी समाधान व्यक्त केले. या प्रशिक्षणामुळे विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रिया स्पष्ट झाली असून, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्यास मदत होईल, असा विश्वास सदस्यांनी व्यक्त केला.





