काँग्रेसची जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार तयारी सुरू; राहुल गांधींची आज रामबन, अनंतनागमध्ये रॅली

Jammu Kashmir Elections 2024 | जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. आप-आपल्या पक्षांकडून उमेदवारांची देखील घोषणा केली जात आहे. यातच आता काँग्रेस पक्ष आज बुधवारपासून मिशन काश्मीरला सुरुवात करत आहे. काँग्रेस नेते आणि पक्षाचे स्टार प्रचारक राहुल गांधी आज जम्मू-काश्मीरमध्ये दोन सभा घेणार आहेत.
राहुल गांधी आज रामबन आणि अनंतनाग जिल्ह्यात दोन जाहीर सभांना संबोधित करणार आहेत. पहिल्या टप्प्यातील निवडणुक 18 सप्टेंबर रोजी होणार असल्याने त्यादृष्टीने काँग्रेस पक्षाने आपल्या निवडणूक प्रचाराला वेग दिला आहे. पक्षाने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून त्यात राहुल, सोनिया आणि प्रियंका यांच्यासह ४० जणांची नावे आहेत.
राहुल यांचा जम्मू-काश्मीर दौरा
राहुल गांधी दिल्लीहून जम्मूला पोहोचल्यानंतर विमानाने रामबन जिल्ह्यातील गुल येथे पोहोचतील, तेथे ते सकाळी साडेअकरा वाजता रॅलीला संबोधित करतील. बनिहालमधून निवडणूक लढवणारे पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष विकार रसूल वानी यांचा प्रचार ते करणार आहेत. यानंतर ते दुपारी 1 वाजता अनंतनाग जिल्ह्यातील डुरू येथे जातील, तेथे ते काँग्रेसचे सरचिटणीस आणि माजी मंत्री गुलाल अहमद मीर यांच्या समर्थनार्थ जाहीर सभेला संबोधित करतील. त्यानंतर संध्याकाळी ते दिल्लीला परततील. Jammu Kashmir Elections 2024 |
काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स एकत्र लढणार
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स एकत्र लढणार आहेत. प्रदीर्घ कालावधीनंतर दोन्ही पक्ष निवडणूकपूर्व युती करून निवडणूक लढवणार आहेत. विधानसभेच्या एकूण ९० जागांपैकी नॅशनल कॉन्फरन्स ५१ जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर काँग्रेस ३२ जागांवर लढणार असून पाच जागांवर मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. याशिवाय, मित्रपक्ष सीपीआयएम आणि पँथर्ससाठी दोन जागा सोडण्यात आल्या आहेत. या आघाडीची थेट स्पर्धा भारतीय जनता पक्षाशी होणार आहे. Jammu Kashmir Elections 2024 |
तीन टप्प्यात निवडणुका होणार
जम्मू-काश्मीरमध्ये प्रस्तावित विधानसभा निवडणुका तीन टप्प्यात होणार आहेत. पहिला टप्पा १८ सप्टेंबरला, दुसरा टप्पा २५ सप्टेंबरला आणि तिसरा टप्पा १ ऑक्टोबरला होणार आहे. ९० जागांच्या या विधानसभेत कलम ३७० हटवल्यानंतर आणि केंद्रशासित प्रदेशाच्या निर्मितीनंतर होत असलेल्या या निवडणुकीत विजयासाठी सर्व पक्ष आपली पूर्ण ताकद लावत आहेत.
हेही वाचा:





