उंब्रज – महाराष्ट्र कर्नाटक व आंध्रप्रदेश राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पाल येथील खंडोबा देवाची यात्रा खंडोबा म्हाळसा विवाह सोहळा शुक्रवार (दि. ०२/०१/२०२६) संपन्न होत आहे. त्याकरिता प्रशासनाच्या सहकार्याने पाल ग्रामपंचायत सज्ज झाली आहे, असे भाजपचे जिल्हाउपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी पाल ग्रामपंचायतच्या आढावा बैठकी वेळी सांगितले. यावेळी अध्यक्षस्थानी सरपंच सुनीता घाडगे होत्या. यावेळी ग्रामपंचायत पाल तर्फे यात्रा कालावधीसाठी केलेल्या विविध कामांचा आढावा घेण्यात आला. यात्रा भरविण्यात येणाऱ्या संपूर्ण वाळवंट परिसराची, मंदिर परिसराची व संपूर्ण गावातील स्वछता करण्यात आली असून संपूर्ण मिरवणूक मार्गावरील रस्त्यांचे नियोजन पूर्ण करण्यात आल्याची माहिती यात्रा कमिटी चेअरमन प्रशांत दळवी यांनी दिली. यात्रेसाठी आलेल्या सर्व व्यापाऱ्यांना जागा वाटप पूर्ण झाले असून त्याठिकाणी असलेल्या व्यापाऱ्यांसाठी व भाविकांसाठी कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचे तब्बल ५० नळाद्वारे नियोजन केले असून महिला व पुरुषांसाठी स्वच्छता गृहांचे देखील पुनरूज्जीवन केल्याचे उपसरपंच गणेश खंडाईत यांनी सांगितले. तर यात्रा नियोजनासाठी ग्रामपंचातीला मिळणारे अनुदान अल्प असून त्यात भरधोस वाढीची मागणी शासनाकडे करण्यात यावी, अशी मागणी माजी उपसरपंच सुनील काळभोर यांनी केली. पाल गावामध्ये येणाऱ्या सर्व बाजूच्या रस्त्यांची डागडुजी बांधकाम विभागाच्या सहकार्याने करण्यात आली असून सर्व मार्गावर विद्युत वितरण कंपनीच्या वतीने प्रकाश व्यवस्था करण्यात आल्याची माहिती सदस्य शिवराज पाटील यांनी दिली. तर संपूर्ण गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून मिरवणूक मार्गाची व यात्रा भरणाऱ्या ठिकाणाची पोलीस विभागाकडून पाहणी केली असून त्यांच्या मार्गदर्शखाली आवश्यक सर्व व्यवस्था करण्यात आल्याचे सदस्य प्रकाश जगताप यानी सांगितले. तसेच नुकत्याच जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, प्राताधिकारी, तहसीलदार, देवस्थान कमिटी व इतर सर्वविभागाचे अधिकारी यांच्या आढावा बैठकीमध्ये झालेल्या सर्व सूचनांचे पालन करून सर्वाच्या सहकार्याने भरणारी पाल यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी ग्रामपंचायत पालने प्रशासनाच्या सहकार्याने कंबर कसली आहे.