Alandi : आळंदीत कार्तिकी यात्रेच्या तयारीला वेग
Alandi : यासंदर्भात मंगळवारी (दि. 17) सकाळी 11.30 वाजता आळंदी नगरपरिषदेच्या सभागृहात उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वनियोजन बैठक झाली.

आळंदी : श्रीक्षेत्र आळंदी येथे होणार्या कार्तिकी यात्रेसह संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या प्रशासकीय तयारीला वेग आला आहे. लाखो भाविकांच्या सोयीसाठी स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य, वाहतूक आणि सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन करण्यात येत आहे. यासाठी एक हजार मोबाईल शौचालये, 400 अतिरिक्त सफाई कर्मचारी, 180 सीसीटीव्ही कॅमेरे आणि 700 सीटीपीटी आसने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सर्व विभागांनी आपापली कामे 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावीत, असे निर्देश बैठकीत देण्यात आले. येत्या 4 डिसेंबर रोजी कार्तिकी यात्रा, तर 6 डिसेंबरला संत ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा होणार आहे.
यासंदर्भात मंगळवारी (दि. 17) सकाळी 11.30 वाजता आळंदी नगरपरिषदेच्या सभागृहात उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वनियोजन बैठक झाली. बैठकीस श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान समितीचे विश्वस्त, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस उपायुक्त, आळंदी व दिघी पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ अधिकारी, वाहतूक पोलीस विभागाचे अधिकारी, आळंदीचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी, यात्रा व नियोजन समितीचे सभापती, नगरसेवक-नगरसेविका तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. आरोग्य, विद्युत, सार्वजनिक बांधकाम, परिवहन, पीएमपीएमएल, अन्न व औषध प्रशासनाचे प्रतिनिधी आणि केळगाव व चर्होली ग्रामपंचायतींचे ग्रामसेवकही बैठकीला उपस्थित होते.
आरोग्य सुविधांसाठी दहा वैद्यकीय बूथ, रुग्णवाहिका, ऑक्सिजन बेड आणि औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्यासाठी चार ठिकाणी पाणी भरणा केंद्रे उभारली जाणार आहेत. वडगाव, चाकण, मरकळ आणि चर्होली रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, वाहनतळांची दुरुस्ती, अतिक्रमणे हटविणे आणि वाहतुकीचे नियोजन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. महिलांसाठी हिरकणी कक्षात पाच हजार सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. तसेच इंद्रायणी नदीत सांडपाणी सोडले जाणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले. बैठकीच्या शेवटी उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे यांनी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून नियोजित वेळेत सुविधा पूर्ण कराव्यात, असे निर्देश दिले. मागील यात्रांमधील अनुभव लक्षात घेऊन यंदा भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, यासाठी काटेकोर नियोजन करण्याचे आवाहन त्यांनी केले.
सुरक्षा आणि स्वच्छतेवर विशेष भर
यात्रेदरम्यान शहरातील प्रमुख रस्ते, मंदिर परिसर आणि दर्शनबारीत स्वच्छता राखण्यासाठी 400 अतिरिक्त सफाई कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी 180 सीसीटीव्ही कॅमेरे, 400 बॅरिकेड्स आणि वॉच टॉवर उभारण्यात येणार आहेत. एक डिसेंबरपासून विशेष पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे.
बैठकीत पत्रकारांना प्रवेश नाकारला
कार्तिकी यात्रा नियोजनाच्या महत्त्वपूर्ण बैठकीला पत्रकारांना उपस्थित राहण्यास मनाई करण्यात आल्याने पत्रकारांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या आदेशानुसार पत्रकारांना बैठकीपासून दूर ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. लाखो भाविकांशी संबंधित स्वच्छता, आरोग्य, वाहतूक आणि सुरक्षेच्या विषयांवर चर्चा होत असताना माध्यमांना दूर ठेवणे योग्य नाही, अशी भूमिका आळंदी शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार एम. डी. पाखरे आणि पत्रकार रोहिदास कदम यांनी मांडली. प्रशासनाने अशा बैठका पारदर्शक पद्धतीने घेऊन माध्यमांना आवश्यक माहिती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.





