Preity Zinta : आमिर खानकडे दुर्लक्ष केल्याच्या आरोपांवरून प्रीती झिंटा संतापली; व्हायरल व्हिडिओवर पापाराझींना सुनावलं
Preity Zinta : फोटोग्राफर्सच्या गर्दीत ती थोडी गोंधळलेली दिसते आणि त्यांना रस्ता विचारताना ऐकू येते. फोटोग्राफर्सनी तिला दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रीतीने दुसऱ्या मार्गाने जाण्याचा निर्णय घेतला.

Preity Zinta : बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा तब्बल आठ वर्षांनंतर ‘पार्टिशन १९४७’ या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. सध्या ती अभिनेता सनी देओल आणि निर्माते आमिर खान यांच्यासह चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
या दरम्यान, एका व्हायरल व्हिडिओमुळे प्रीती चर्चेत आली असून, आमिर खानकडे दुर्लक्ष केल्याचा दावा करणाऱ्या एका पापाराझी पेजला तिने सडेतोड उत्तर दिले आहे.
‘फिल्म गॅलेक्सी’ या इन्स्टाग्राम पेजने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये प्रीती झिंटा तिच्या व्हॅनिटी व्हॅनमधून बाहेर पडताना दिसते. फोटोग्राफर्सच्या गर्दीत ती थोडी गोंधळलेली दिसते आणि त्यांना रस्ता विचारताना ऐकू येते. फोटोग्राफर्सनी तिला दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रीतीने दुसऱ्या मार्गाने जाण्याचा निर्णय घेतला.
यावेळी आमिर खान त्याच्या व्हॅनिटी व्हॅनजवळ उभा होता. प्रीती त्याच्याकडे न पाहता पुढे गेल्याने सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले. याच पार्श्वभूमीवर पापाराझी पेजने “प्रीती झिंटाने आमिर खानकडे दुर्लक्ष केले का?” अशा आशयाचे कॅप्शन देत व्हिडिओ पोस्ट केला.
या दाव्यावर प्रीती झिंटाने तीव्र नाराजी व्यक्त केली. तिने कमेंट करत स्पष्ट केले की, “अशा प्रकारची क्लिकबेट सामग्री पूर्णपणे चुकीची आहे. मी घाईत असल्यामुळे आमिरकडे पाहिलेही नाही. मला काही शॉट्ससाठी तातडीने आत जायचे होते आणि त्यानंतर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विमान पकडायचे होते. नकारात्मकता पसरवण्याच्या उद्देशाने अशा बातम्या तयार करणे योग्य नाही. माझ्या मनात आमिरबद्दल खूप प्रेम आणि आदर आहे. त्यामुळे अशा प्रकारचा गैरसमज पसरवणे अजिबात स्वीकारार्ह नाही.”
दरम्यान, प्रीती झिंटा शेवटची २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘भैयाजी सुपरहिट’ या चित्रपटात दिसली होती. आता ‘पार्टिशन १९४७’मधून ती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. राजकुमार संतोषी दिग्दर्शित या चित्रपटात सनी देओल, शबाना आझमी, अली फजल, करण देओल, अभिमन्यू सिंग, कनिका कपूर आणि खुशी हजारे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
भारत-पाकिस्तान फाळणी आणि पंजाबच्या विभाजनाच्या पार्श्वभूमीवर आधारित असलेला हा चित्रपट आमिर खानच्या निर्मिती संस्थेअंतर्गत तयार करण्यात आला आहे. ‘पार्टिशन १९४७’ १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार असून, त्याच दिवशी इम्रान हाश्मीच्या ‘अवारापन २’ या चित्रपटाशी त्याची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे.






