पुणे- सुरक्षित प्रवासासाठी पुणे रेल्वे स्थानक आवारात पुन्हा एकदा प्री-पेड रिक्षा सेवा सुरू होणार आहे. ही सेवा पुरवणाऱ्या संस्थेला वाहतूक पोलिसांनी ना-हरकत (एनओसी) दिली असून, पुढील आठवडाभरात ही सेवा सुरू होईल. यामुळे रात्री-अपरात्री प्रवाशांचा प्रवास सुरक्षित होणार आहे.
रिक्षा चालकांकडून आकारण्यात येणारा अव्वाच्या सव्वा दर आणि सुरक्षित प्रवास या उद्देशातून पुणे स्टेशन आवारात काही महिन्यांपूर्वी प्रीपेड रिक्षा सेवा सुरू करण्यात आली होती. पण, ती करोना काळामध्ये बंद पडली.
परंतु मागील काही दिवसांत पुणे स्थानक परिसरात घडलेल्या बलात्काराच्या घटनांमुळे परिसरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यातच घटनेतील आरोपी हे रिक्षाचालक असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी बेकायदेशीरपणे चालणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई सुरू केली. तसेच, नागरिकांच्या सुरक्षेसाठी येथील बंद पडलेली प्री-पेड रिक्षा सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे स्टेशन परिसरातून प्री-पेड रिक्षा सेवा सुरू करण्यासाठी परवानागी देण्यात आली आहे. ही सेवा पुरवणाऱ्या संस्थेला पत्रव्यवहार केला असून समन्वय साधण्यात येत आहे. पुढील आठवडाभरात ही सेवा सुरू होईल.
– राहुल श्रीरामे, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा