मान्सूनपूर्व पावसाने राज्यात पाणी-पाणी; पुढचे 36 तास महत्वाचे..

पुणे – मराठवाड्यासह कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात मान्सूनपूर्व पाणी-पाणी केले आहे. हा पावसाचा धडाका शुक्रवारीही अनेक ठिकाणी कायम होता. यंदा प्रथमच मे महिन्यात सलग ८ दिवस पाऊस कोसळल्याने उन्हाळी पिके, भाजीपाल्यासह फळबागांची प्रचंड हानी झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दरम्यान, सलग सुरू असलेल्या पावसामुळे लातूरसह अनेक ठिकाणी पुराचा धोका उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज झाला आहे.
मराठवाड्यात सर्वच जिल्ह्यांत पावसाचा रोजच धडाका सुरू आहे. छत्रपती संभाजीनगरसह जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडत असून, शुक्रवारीही दुपारनंतर बऱ्याच भागात अवकाळी पावसाने झोडपले. त्यामुळे नद्या, नाले, ओढे भरून वाहू लागले असून, काही ठिकाणी पूर स्थिती निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे. लातूर जिल्ह्यात तर आपत्ती व्यवस्थापनाला सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातही ब-याच भागात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतपिकांची प्रचंड हानी होत असल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागत आहे.
पश्चिम महाराष्ट्र, कोकणातही अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले असून, सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गुहागरमध्ये दुपारनंतर जोरदार पाऊस झाला. आंबा बागायतदारांना पावसाचा मोठा फटका बसत आहे. पुणे, मुंबईतही पावसाचा जोर कायम आहे. यासोबतच विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी पाऊस पडत असून, पावसाचा जोर कायम असल्याचे चित्र राज्यात सर्वत्र पाहायला मिळाले.
पुढचे 36 तास अवकाळीचेच! अरबी समुद्र खवळण्याची शक्यता; मच्छिमारांना मासेमारीसाठी न जाण्याचा इशारा
गेल्या चार दिवसांपासून राज्यातील विविध भागात तुफान पाऊस होत आहे. मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली असून संपूर्ण कोकणपट्टीसह मुंबई व उपनगराला पाऊस झोडपणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पुढील 36 तास अत्यंत महत्त्वाचे असून अरबी समुद्रात कमी दाबाचे तयार झालेले क्षेत्र आणखी तीव्र होत उत्तरेकडे सरकणार आहे. त्यामुळे कोकणपट्टीसह मुंबईत प्रचंड पाऊस होणार असल्याचा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राच्या प्रमुख शुभांगी भुते यांनी दिला आहे.
पुढील 2-4 दिवस गुजरात आणि महाराष्ट्र किनारपट्टी भागात मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, आयएमडीने दिलेल्या विस्तृत हवामान अंदाजानुसार,येत्या 2-3 दिवसांमध्ये मान्सून केरळमध्ये दाखल होण्यासाठी अनुकुल वातावरण तयार झाले आहे. पूर्वमध्य अरबी समुद्रात सध्या नैऋत्य मोसमी पावसाचे वातावरण तयार होत असून कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे कोकण गोवा कर्नाटक व केरळमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट
मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राच्या प्रमुख शुभांगी भुतेंनुसार, अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे जे पुढील 36 तासांत आणखी तीव्र होत उत्तरेकडे सरकणार आहे. अशात कोकण किनारपट्टीवर जोरदार पाऊस होईल, ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. रायगड आणि रत्नागिरीसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून वाऱ्याचा वेग 35-40 किमी तर काही ठिकाणी तो वेग 60 किमी प्रति तास पर्यंत जाण्याची शक्यता आहे.





