satara | पावसाने खोजेवाडी परिसरात खरीपपूर्व मशागतींना वेग

नागठाणे, (प्रतिनिधी) – दि. ४ व ५ रोजी खोजेवाडी परिसरातील अपशिंगे, आंबेवाडी ,धोंडेवाडी ,फत्त्यापूर जावळवाडी ते काशीळ पर्यंत मान्सुनपुर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. गावातील नाले, शिवारातील ओढे भरभरुन वाहिल्याने शेतकरीवर्ग आनंदून गेल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता खरीपपूर्व मशागती व आडसाली ऊस लागणीची रानं तयार करण्यास वेग येणार आहे.
दि. ४ व ५ रोजी सकाळपासूनच वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत होता. हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे सध्या ९ तारखेपर्यंत मान्सुनपुर्व पावसाचे वातावरण राहणार आहे. त्या अंदाजानुसार सलग दोन दिवस विजेचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह खोजेवाडी परिसरात पाऊस दाखल झाला व दीड दोन तास शांतपणे पडत राहिला. त्यामुळे फेब्रुवारी पासुन नांगरट करून ठेवलेली रानं तुडूंब भरून वाहू लागल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसत होते.
गावातील नाले व शिवारातील ओढ़यांना पाणी वाहिल्याचे दिसत होते. दि. ६ रोजी पावसाने उसंत घेतली आहे. मात्र या दोन दिवस झालेल्या पावसाने यावर्षी उन्हाळ्याच्या प्रचंड झळा सोसलेल्या नागरिकांनाही थंड हवेची झुळूक अनुभवायला मिळत असल्याने पंखे व एअर कुलरलाही सुट्टी मिळाल्याचे दिसत होते. आता या पावसाने मोकळ्या रानांमध्ये तण वाफल्यामुळे मशागतींनंतर त्याचाही नायनाट होण्यास मदत होणार आहे.





