Satara | प्रतापराव भोसले यांच्याकडून पदांचा उपयोग जनतेसाठी

वाई. (प्रतिनिधी) – प्रतापराव भोसले (भाऊ) राजकारणातील आदर्श व प्रामाणिक व्यक्तिमत्त्व होते. केंद्रीय राजकारणात असताना त्यांनी अनेक पदे भूषविली व त्याचा उपयोग त्यांनी देशातील जनतेसाठी केला, असे मत ॲड. प्रतापसिंह पिसाळ देशमुख यांनी व्यक्त केले.
येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयात संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त कै. प्रतापराव भोसले उर्फ भाऊ यांच्या तृतीय मासिक स्मृतीदिनानिमित्त आठवणीतले भाऊ या विषयावर ॲड. प्रतापसिंह पिसाळ देशमुख बोलत होते.
प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. हणमंतराव कणसे, प्रा. डॉ. चंद्रकांत कांबळे, बाळासाहेब कोकरे, स्टाफ सेक्रेटरी डॉ. अंबादास सकट, रमेश डुबल यांची प्रमुख उपस्थिती होती.
ॲड. देशमुख म्हणाले, माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी खासदारांमध्ये समन्वय ठेवण्याचे काम भाऊंवर सोपविले होते. एक सच्चा व एकनिष्ठ व्यक्ती म्हणून केंद्रीय राजकारणात त्यांच्या शब्दाला फार मोठे वलय होते.
केंद्रातील अनेक मंत्री भाऊंना भेटण्यासाठी त्यांच्या घरी आणि शेतावर जात होते. शेती करणे भाऊंचा आवडता छंद होता. ज्या काळामध्ये ट्रॅक्टरची सुविधा नव्हती तेव्हा ते स्वतः बैलाच्या सहाय्याने शेतीची मशागत करीत.
शेतकऱ्यांनी गोबरगॅसची निर्मिती करुन त्याचा वापर करावा असे ते शेतकऱ्यांना आवर्जून सांगत. शेती व शेतकऱ्यांवर नितांत प्रेम असणाऱ्या भाऊंनी आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या मुलांसाठी महाविद्यालयामध्ये ‘जय किसान’ विद्यार्थी वसतिगृहाची निर्मिती करुन, विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन दिली.
प्राचार्य डॉ. फगरे म्हणाले, भाऊ तत्वनिष्ठ असल्याने ते आपले विचार परखडपणे मांडत होते. पाहुण्यांची ओळख व सूत्रसंचालन गणेश चव्हाण यांनी केले, डॉ. अंबादास सकट यांनी आभार मानले.





