Pratap Sarnaik : थांब्यांच्या परवानगीसाठी कडक धोरण अवलंबणार; प्रताप सरनाईक यांनी दिला इशारा

मुंबई : लांबपल्ल्याच्या प्रवासादरम्यान एसटी बस विविध हॉटेल-मोटेल थांब्यावर थांबतात. तेथे प्रवाशांना चहा-नाष्टा किंवा जेवण, नैसर्गिक विधीसाठी वेळ दिला जातो. परंतु अनेक हॉटेलमधील थांब्याबाबत प्रवाशांच्या तक्रारी येत असून प्रामुख्याने प्रसाधनगृहे अस्वच्छ असणे, शिळा नाश्ता, खाद्यपदार्थांचे अवास्तव दर, याचबरोबर संबंधित हॉटेलमधील कर्मचारी व मालकांची वर्तणूक आदी तक्रारी करण्यात येत आहेत. त्यामुळे हॉटेल-मोटेलना परवानगी देताना यापुढे नवीन कडक धोरण स्वीकारले जाईल, असे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.
लांबपल्ल्याच्या प्रवासामध्ये एसटी बस ज्या हॉटेल-मोटेलवर थांबतात, तेथे प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सेवा – सुविधांबाबत अनेक तक्रारी येत आहेत. प्रवाशांच्या तक्रारीद्वारे संबंधित हॉटेलवर दंडात्मक कारवाईसह त्यांचा थांबा रद्द करण्याचे नवीन धोरणा राबवले जाणार आहे. तसेच ज्या विभागात अशा हॉटेल-मोटेल संदर्भात तक्रार येतील, त्या विभाग नियंत्रकांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्याची तरतूद या नव्या धोरणात करण्यात येणार आहे, अशी माहिती सरनाईक यांनी दिली.
एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती समजून घेण्यासाठी, तसेच भविष्यातील नियोजनासाठी एक आर्थिक श्वेतपत्रिका तयार करावी, असे निर्देश प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले. सुमारे १० हजार कोटी संचित तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाला कर्मचाऱ्यांचे वेतन, वाहन खरेदी, वाहन चाक खरेदी, इंधन खरेदी, स्थानकाचे नूतनीकरण व इतर आस्थापना खर्चासाठी दररोज आर्थिक कसरत करावी लागते.





