प्रशांत कोरटकरला कोर्टाचा दणका; दोन दिवसांची पोलीस कोठडी वाढ

कोल्हापूर: छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकावणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर सत्र न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी वाढवली आहे.
शुक्रवारी (28 मार्च) मोठ्या बंदोबस्तात त्याला न्यायालयात हजर केलं गेलं. यापूर्वी त्याला तीन दिवसांची कोठडी सुनावली होती, आता 30 मार्चपर्यंत तो पोलिसांच्या ताब्यात राहील. पोलिसांनी कोरटकरला पळून जाण्यासाठी मदत करणारे, ऑनलाइन पेमेंट आणि वाहनांचा तपास बाकी असल्याचं सांगत कोठडी वाढवण्याची मागणी केली होती.
न्यायाधीश एस.एस. तट यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत सरकारी वकील सूर्यकांत पोवार आणि सावंत यांचे वकील असीम सरोदे यांनी युक्तिवाद केला. पोलिसांनी सांगितलं की, कोरटकरचे आवाजाचे नमुने घेतले असून, त्याने दिलेल्या नावांनुसार नोटिसा पाठवल्या आहेत. त्याने वापरलेली एक गाडी जप्त झाली असून, आणखी वाहनांचा तपास सुरू आहे. कोरटकरला आर्थिक मदत कोणी केली, फोनवेळी कोण सोबत होतं, याचा शोध घ्यायचा आहे. पोवार यांनी धीरज चौधरीसह इतरांची चौकशी आणि सामाजिक तेढ निर्माण करण्याच्या हेतूचा तपास महत्त्वाचा असल्याचं नमूद केलं.
कोरटकरचे वकील सौरभ घाग यांनी त्याला अंतरिम जामीन असताना चौकशीला सामोरं जाण्याची तयारी दर्शवली होती, असा युक्तिवाद केला. ते म्हणाले, “कोरटकर एकटाच कमावता आहे, त्याला मुलगी आहे, तीन दिवसांची कोठडी पुरेशी होती.” दरम्यान, सुनावणीत घाग आणि सरोदे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.
सरोदे यांनी कोरटकरच्या आलिशान गाड्या आणि संशयितांच्या पार्श्वभूमीचा तपास मागितला, तर घाग यांनी सरोदेंना कोर्टात शांत राहण्यास सांगितलं. कोर्टाने पोलिसांच्या बाजूला झुकत कोठडी वाढवली. तपासात कोरटकरने प्रशिक पडवेकर, धीरज चौधरी, हिफाजत अली आणि राजू जो यांची नावं घेतली आहेत.





