नागपूर : इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देण्याच्या प्रकरणात नागपूरचे प्रशांत कोरटकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात येणार आहे. त्यासाठी कोल्हापूर पोलिसांचे पथक नागपूरला पोहोचले आहे. मात्र प्रशांत कोरटकर हे दोन दिवसांपासून राहत्या घरातून पसार असल्याची माहिती समोर आलेली आहे. इतकेच नाही तर त्यांचा मोबाइल सुद्धा स्विच ऑफ असून अद्यापही त्यांचा शोध लागलेला नाही. इंद्रजीत सावंत यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना कोणी पकडून दिले, असा वस्तुनिष्ठ इतिहास समोर आणण्याचा दावा केला होता. यावर प्रशांत कोरटकर यांनी इंद्रजीत सावंत यांना मध्यरात्री फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. इतकेच नाही तर छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या बद्दल सुद्धा अपशब्द वापरले होते. त्यानंतर प्रशांत कोरटकर यांच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप इंद्रजीत सावंत यांनी समाज माध्यमांवर टाकली होती. त्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. कोल्हापूर मधील जुना राजवाडा पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे आता प्रशांत कोरटकर यांचा शोध घेण्यासाठी कोल्हापूर पोलिस नागपूर मध्ये दाखल झाले आहेत. कोरटकरचा शोध घेत असलेले कोल्हापूर पोलिसांचे एक पथक नागपुरातील त्यांच्या घरी पोहोचले आहे. मात्र प्रशांत कोरटकर हे घरात नसल्याची माहिती त्यांच्या घरच्यांकडून मिळाली आहे. त्यामुळे आता कोल्हापूर पोलिस कोरटकर यांच्या घरातील मंडळींकडून त्यांची माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहे.