नवी दिल्ली – 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्ष मजबूत करण्यासाठी आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी, कॉंग्रेस प्रमुख सोनिया गांधी यांनी सोमवारी विशेषाधिकार प्राप्त कृती गट- 2024 स्थापन करण्याचा निर्णय़ घेतला. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनाही या गटात सामील होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. मात्र किशोर यांनी काँग्रेस प्रवेशास नकार दिला आहे. आता त्यांनी नकार दिल्याचे कारणं समोर आली आहेत.
किशोर यांनी ट्विटमध्ये म्हटले की, “मला विशेषाधिकार प्राप्त कार्यगटाचा भाग म्हणून पक्षात सामील होऊन निवडणुकीची जबाबदारी घेण्याची काँग्रेसने दिलेली ऑफर स्वीकारण्यास मी नकार दिला आहे. ते पुढं म्हणाले की, माझं प्रामाणिक मत आहे की, पक्षाला माझ्यापेक्षा सक्षम नेतृत्वाची आणि सामूहिक इच्छाशक्तीची गरज आहे. जेणे करून ‘परिवर्तनात्मक सुधारणांद्वारे पक्षाला सध्या भेडसावणाऱ्या समस्या दुर करता येतील.
दरम्यान सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत किशोर यांनी काँग्रेस नेतृत्वाला पक्षाने तातडीने निर्णय घ्यावे तसेच निवडणूक व्यवस्थापन आणि संघटना व्यवस्थापनासाठी स्वतंत्र विंग स्थापन करण्याचा सल्ला दिला होता. तसेच प्रशांत किशोर यांना काँग्रेसमध्ये सुधारणा करण्यासाठी पूर्ण स्वातंत्र हवं होतं. मात्र ही मागणी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना मान्य नव्हती.
शिवाय प्रशांत किशोर यांचा बिहार, जम्मू-काश्मीर आणि महाराष्ट्रातील जुन्या मित्रपक्षांना सोडचिठ्ठी देण्याचा दिलेला सल्ला आणि पक्ष नेतृत्वाबाबत मांडलेलं मत काँग्रेस नेतृत्वाला रुचलं नसल्याचं सांगण्यात येतय.
एका काँग्रेस कार्यकर्त्याने सांगितल की, प्रशांत किशोर यांना पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि काँग्रेस अध्यक्ष हे वेगवेगळे हवे होते. किशोर यांच्यामते प्रियंका गांधींनी पक्षाध्यक्ष व्हावे. मात्र पक्षातील नेत्यांना राहुल गांधींच पुन्हा अध्यक्ष व्हावे असं वाटतं.