Prashant Kishor : राजकारणात सक्रिय होण्यामागचे कारण प्रशांत किशोर यांनी केले स्पष्ट; म्हणाले..

पाटणा : प्रभावी निवडणूक रणनीतीकार अशी ओळख निर्माण करणाऱ्या प्रशांत किशोर यांनी राजकारणात सक्रिय होण्यामागचे कारण उघड केले. बिहारमधील नितीश कुमार सरकारने कोरोना संकट काळात असंवेदनशीलता दाखवली. त्यामुळे गृहराज्याची (बिहार) सेवा करण्याचा निर्णय मी घेतला, असे जनसुराज पक्षाचे संस्थापक किशोर यांनी म्हटले.
कोरोना संकटावेळी बिहारी कामगारांना इतर राज्यांमधून हुसकावण्यात आले. त्यामुळे घरी परतण्यासाठी त्यांना हजारों किलोमीटर अंतराची पायपीट करावी लागली. ती स्थिती पाहून मी व्यथित झालो, असे किशोर एका मुलाखतीत बोलताना म्हणाले. बिहारच्या सत्तेवर डोळा ठेऊन किशोर यांनी राजकीय पक्ष स्थापन केल्याचा आरोप होतो. तो त्यांनी खोडून काढण्याचा प्रयत्न केला.
बिहारमधील २०१५ यावर्षीच्या निवडणुकीत जेडीयू, राजद यांचा समावेश असणाऱ्या महाआघाडीने मोठा विजय मिळवला. त्या विजयासाठी मी हातभार लावला. सत्तेची, पदाची लालसा असती; तर त्यावेळीच मी ती पूर्ण करू शकलो असतो, अशी भूमिका त्यांनी मांडली. बिहारमध्ये चालू वर्षीच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होईल. त्या राजकीय रणसंग्रामाला ताकदीने सामोरे जाण्याची तयारी किशोर आणि त्यांच्या पक्षाने सुरू केली आहे.





