हडपसर – ठिकठिकाणी झालेले स्वागत… माता-भगिनींनी केलेले औक्षण… ज्येष्ठांनी दिलेला आशीर्वाद… महाविकास आघाडीच्या विजयाचा विश्वास… अशा उत्स्फूर्त प्रतिसादात हडपसर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप यांची केशवनगर-मुंढवा परिसरात पदयात्रा व बाईक रॅली पार पडली. ग्रामदैवत भैरवनाथाचे सहकुटुंब दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ केल्यानंतर जगताप यांची पदयात्रा भोसले गार्डन येथे सुरू करण्यात आलेल्या मध्यवर्ती निवडणूक कचेरीपासून सुरू झाली. मुंढवा-केशवनगर या भागातून निघालेल्या पदयात्रेचे नागरिकांनी स्वागत केले. पदयात्रेत माजी उपमहापौर बंडुतात्या गायकवाड, माजी नगरसेवक योगेश ससाणे, समाजवादी नेते प्रा. सुभाष वारे, शिवसेना उपशहर प्रमुख समीर तुपे, राष्ट्रवादी काँग्रेसचे हडपसर विधानसभा अध्यक्ष प्रविण तुपे, काँग्रेसचे हडपसर विधानसभा अध्यक्ष दिलीप तुपे यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशांत जगताप यांनी घरोघरी जाऊन प्रत्येक नागरिकांशी संवाद साधला. ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. माता-भगिनींनी त्यांचे औक्षण करून त्यांना विजयी भवचा आशीर्वाद दिला. रामकृष्ण हरी, वाजवा तुतारीच्या जयघोषाने परिसरात चैतन्य पसरले होते. महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी झाले होते.