पुणे : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या तोंडावर पुण्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) आणि अजित पवार गट यांच्यात पुणे महापालिकेसाठी युती होण्याची शक्यता वाढली आहे. अशातच आता शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आज मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या पक्षाच्या प्राथमिक आणि क्रियाशील सदस्यत्वासह शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. काय म्हणाले प्रशांत जगताप? सोशल मीडियावर पोस्ट करत प्रशांत जगताप म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्राथमिक व क्रियाशील सदस्यत्वाचा आज मी राजीनामा देत आहे. आजपर्यंत दिलेल्या संधीसाठी नेतृत्वाचे मनापासून आभार. २७ वर्षांपूर्वी मी सामाजिक व राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवले, तेव्हा कुठल्या पदासाठी नव्हे, तर पुरोगामी विचारांची चळवळ पुढे नेण्यासाठी मी कार्यरत झालो. आज २७ वर्षांनंतरही हेच एकमेव ध्येय माझ्या मनात आहे. यापुढेही पुरोगामी विचारांसाठी माझी सामाजिक व राजकीय वाटचाल सुरूच असेल, आजपर्यंत अत्यंत निष्ठेने मला साथ देणाऱ्या, यापुढेही संघर्षाच्या वाटेवर माझ्यासोबत येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार, असं प्रशांत जगताप यांनी म्हटलं आहे. पुरोगामी विचारांसाठी वाटचाल सुरूच राहील यावेळी बोलताना प्रशांत जगताप म्हणाले की, २७ वर्षांपूर्वी मी सामाजिक व राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवले तेव्हा कुठल्या पदासाठी नव्हे, तर पुरोगामी विचारांची चळवळ पुढे नेण्यासाठी कार्यरत झालो. आज २७ वर्षांनंतरही हेच एकमेव ध्येय माझ्या मनात आहे. यापुढेही पुरोगामी विचारांसाठी माझी सामाजिक व राजकीय वाटचाल सुरूच असेल. आजपर्यंत निष्ठेने साथ देणाऱ्या आणि पुढेही संघर्षाच्या वाटेवर सोबत येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानले. एका पराभवामुळे भीती नाही; विधानसभेत हरलो तरी आदर पुढे बोलताना म्हणाले, एका पराभवामुळे भीती बाळगणारा मी नाही. विधानसभेत मी हरलो, पण तिथल्या सगळ्या लोकांच्या प्रती मला आदर आणि मान आहे. पार्टी कशी निवडणूक लढवेल याची मी तयारी केली होती. माझ्यासारखा कार्यकर्ता व्यथित झाला होता. माझ्या मनात विचारांची घालमेल होती. पण घालमेल माझ्या आयुष्यावर उलटली. सद्विवेक बुद्धीला जागरूक ठेवून, सगळे प्रसंग डोळ्यासमोर ठेऊन आणि सर्व नेत्यांचा मान ठेऊन मी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचे आभार जगताप यांनी आपल्या राजकीय प्रवासातील मार्गदर्शकांचे आभार मानले. ते म्हणाले, सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाली. पक्षात चांगल्या पद्धतीने काम केले. हडपसर-वानवडी परिसरातील नागरिकांनी मला ‘दादा’ म्हणून दाद दिली. मी रस्त्यावर उतरून काम केले, हे पुणेकरांसाठी केले. मी कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या घरातून आलो. आज मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार शहराध्यक्ष पदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मी शशिकांत शिंदे यांना राजीनामा पाठवला आहे.”