अमरावती : राज्यातील शिक्षकांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजपा आमदार प्रशांत बंब पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. शिक्षकांना “लाडावलेले” संबोधत संपाच्या काळात वेतनकपात करण्याची आणि गरज भासल्यास “निलंबित करण्याची” मागणी प्रशांत बंब यांनी केली होती. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात खळबळ उडाली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक शेखर भोयर यांनी आमदार बंब यांना इशारा दिला आहे. काय म्हणाले शेखर भोयर ? “चार फुटाचे आमदार प्रशांत बंब हे शिक्षण व्यवस्था घडवणाऱ्या शिक्षकांविषयी सातत्याने अर्वाच्य भाषा वापरत आहेत. शिक्षक देशाची पिढी घडवतात, आणि दोन-तीन टक्के लोकांच्या गैरवर्तनावरून संपूर्ण समाजाला वाईट ठरवणे अयोग्य असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच “यापुढे शिक्षकांविषयी शिवराळ, अर्वाच्य भाषा वापरली, तर शिक्षक रस्त्यावर उतरतील आणि तुम्हाला काळं फासल्याशिवाय राहणार नाही असा इशारा शेखर भोयर यांनी दिला. भाजपातूनच आलेल्या या तीव्र प्रतिक्रियेमुळे राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हं आहेत. शिक्षकांच्या नाराजीत भर टाकणाऱ्या या वक्तव्यावर आता पक्षांतर्गतच तणाव वाढण्याची शक्यता आहे.