Prasad Lad : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज अंतरवली सराटी येथे भाजप नेते आमदार प्रसाद लाड आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यात महत्त्वाची भेट झाली. या भेटीदरम्यान ऑन-कॅमेरा चर्चेत बोलताना प्रसाद लाड भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. मनोज जरांगे यांनी दोन दिवसांपूर्वी प्रसाद लाड यांना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी अंतरवलीत येण्याचं आवाहन केलं होतं. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रसाद लाड आज जरांगेंची भेट घेण्यासाठी पोहोचले. मात्र, या भेटीपूर्वीच छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली. प्रसाद लाड (Prasad Lad) ज्या हॉटेलमध्ये थांबले होते, तेथे दोघांनी घुसण्याचा प्रयत्न केला. याआधी त्यांच्या पीएला धमकीचे फोनही आले होते. या प्रकरणी योगेश शितोळे पाटील आणि गणेश उगले यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. धमकीच्या प्रकारावर बोलताना प्रसाद लाड भावूक झाले. “धमकीचे फोन येतातच. पण काल काही लोकांनी हॉटेलमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. त्यांनी माझ्या आईवरून शिवीगाळ केली. माझ्या डोळ्यात पाणी आलं. शिव्या देणं सोपं असतं, पण मनाला ठेच लागते,” असं ते म्हणाले. प्रसाद लाड यांनी केली विनंती (Prasad Lad) “माझे आणि मनोज जरांगे यांच्यात अनेकदा मतभेद झाले, हे मी मान्य करतो. पण मराठा समाजासाठी त्यांनी दिलेला लढा मोठा आहे. त्यांच्या आंदोलनामुळे समाजाला आरक्षण मिळालं. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मी नेता म्हणून नाही, तर समाजातील एक सामान्य माणूस आणि लहान भाऊ म्हणून येथे आलो आहे. 30 मे रोजी आंदोलन होऊ नये, अशी माझी विनंती आहे. उन्हाचे दिवस आहेत. चर्चेतून मार्ग निघू शकतो.” असे म्हणत आंदोलन न करण्याची विनंती केली. लाड यांचं मोठं विधान (Prasad Lad) यावेळी बोलताना प्रसाद लाड यांनी एक मोठं विधान केलं. ते म्हणाले, गेल्या 70 वर्षात कोणत्याच मराठा समाजाच्या नेत्याने केलं नाही ते फडणवीसांनी केलं आहे. मी वेळवेळी भेटत राहील (Prasad Lad) मला दादांबरोबर खाजगीत देखील चर्चा करायची आहे. दादांच्या सात-आठ मागण्या मी समजून घेणार आहे. मी भाऊ म्हणून विनंती करायला आलोय. मला काही काळ द्यावा लागेल. मी जातीसाठी माती खायला तयार आहे. आमच्यात आपापसात भांडणे लावायचे काम करत आहेत. मी जरांगे यांचे विषय सरकार दरबारी मांडणार आहे. मी वेळवेळी भेटत राहील, असेही प्रसाद लाड यावेळी बोलताना स्पष्ट केले. दरम्यान, मनोज जरांगे यांनी 30 मेपासून पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा राज्य सरकारला दिला आहे. त्याआधी त्यांनी सरकारसमोर 10 महत्त्वाच्या मागण्या ठेवल्या आहेत. यात मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र, आंदोलनातील गुन्हे मागे घेणे, सारथीच्या योजना सुरू करणे, स्वतंत्र मराठा-कुणबी मंत्रालय स्थापन करणे यांसारख्या मागण्यांचा समावेश आहे. हेही वाचा :Rajya sabha elections: राज्यसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर ; १० राज्यांमधील २४ रिक्त जागा भरल्या जाणार