Praniti Shinde : महिला आरक्षणाच्या नावाखाली सरकारला मतदारसंघ पुनर्रचनेचे विधेयक पारित करायचे होते, परंतु काँग्रेसने भाजपचा खरा चेहरा उघडकीस आणला आहे, अशा शब्दात खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी केंद्र सरकारवर टीका केली. खासदार प्रणिती शिंदे आणि शोभा बच्छाव यांनी पत्रकार परिषदेत ही टीका केली. शिंदे म्हणाल्या, या विधेयकाच्या माध्यमातून केंद्राला दक्षिण विरुद्ध उत्तर भारत असा वाद करायचा होता. दक्षिणेच्या ज्या राज्यांनी लोकसंख्या नियंत्रित केली त्यांच्यासाठी ही शिक्षा आहे का? असा प्रश्नही त्यांनी (Praniti Shinde) केला. सरकारला महिला आरक्षण द्यायचे नाही. त्यांना फक्त त्या आडून मतदारसंघ वाढवून त्यांच्या गुंडांना सुरक्षित करायचे आहे. त्यांना महिला आरक्षण द्यायचे असेल तर आताच्या 543 खासदारांच्या संख्येमध्ये आरक्षण द्यायला काय अडचण आहे? खासदारांची संख्या वाढल्यानंतर आम्ही आरक्षण देऊ असे ते म्हणत आहेत. म्हणजेच त्यांना आरक्षण द्यायचे नाही. भाजप सरकारसाठी निवडणूक महत्त्वाची आहे, देशाची अखंडता महत्त्वाची नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खोटा चेहरा आता उघडकीस आला आहे. Praniti Shinde त्यामुळे त्यांचे खोटे आणि भावनिक आवाहन उपयोगी ठरणार नाही. महिलांच्या भावनेशी खेळून मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणण्याचा प्रयत्न भाजप करत असून त्याचा निषेध करते. एकीकडे देशातील पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूची निवडणूक सुरू असताना त्यांनी महिलांची मते मिळवण्यासाठी खोटा प्रयत्न केला, अशा शब्दात शिंदे (Praniti Shinde) यांनी टीका केली. तसेच, मतदारसंघ पुनर्रचनेसंदर्भात अमित शाह यांनी फक्त दक्षिणेच्या राज्यांची आकडेवारी दिली. आम्ही उत्तर भारतीय राज्यांच्या आकडेवारीचा मागणी केली. परंतु अमित शाह यांनी ती आतापर्यंत दिली नाही. आम्ही जातीय जनगणनेची वारंवार मागणी करत आहोत, पण त्यावर हे सरकार काहीच बोलत नाही, असे शिंदे म्हणाल्या.