Prakash Solanke : ‘मी फक्त 10 ते 12 कोटी खर्चून निवडणूक जिंकलो’, प्रकाश सोळंकेंनी जाहीर सभेत दिली कबुली

मुंबई : माजलगावचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी भरसभेत मोठा दावा केला आहे. ‘मी फक्त 10 ते 12 कोटी खर्चून निवडणूक जिंकलो असे आमदार प्रकाश सोळंके म्हणाले आहेत. तसेच इतरांना 35 – 45 कोटी रुपये खर्च आल्याचेही वक्तव्य त्यांनी यावेळी केले. निवडणुकीसाठी निवडणूक आयोगानं उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा 40 लाख रुपयांची मर्यादा ठेवली होती. त्यामुळे सोळंके यांच्यावर निवडणूक आयोग काही कारवाई करणार का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
काय म्हणाले प्रकाश सोळंके?
निवडणूक आली की किती उमेदवार उभे राहतात याचे काही गणित उरले नाही. कोणीही येतं आणि पैशांच्या मस्तीवर उभं राहत, अशी परिस्थिती दुर्दैवाने झाली आहे. गेल्या निवडणुकीत एका उमेदवाराला 45 कोटी तर दुसऱ्याला 35 कोटी लागल्याचे चर्चा आहे. लोक सांगतात मला काही माहित नाही. मला मात्र दहा-बारा कोटी लागले आणि मी निवडून आलो. पुढे ते म्हणाले निवडून येण्यासाठी पैसे लागतात असे काही नाही तर सर्वसामान्यांची कामे करावे लागतात.
टीकेनंतर प्रकाश सोळंके यांची सारवासारव
प्रकाश सोळंके यांनी भरसभेत केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. यानंतर सारवासारव करताना ते म्हणाले ते भाषणात बोललो होतो. भाषणात बोललेले सत्य असते का? मी आणि पक्षांने मिळून जी मर्यादा घालून दिली होती ती मी पाळली आहे. लाखोंच्या एवजी चुकून कोटी निघाले. मी सगळ्यात शेवटी बोललो सुद्धा की चुकून बोललो म्हणून जे खर्चले मी प्रतिज्ञापत्रात दिले आहे ते बरोबर आहे. त्यामुळं आता त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतला जाणार का? काही कारवाई होणार का? हे पाहणे आता महत्वाचे असणार आहे.





