पिंपरी | प्रज्ञानबोधिनी स्कूलमध्ये वर्षारंभ उपासना समारंभ उत्साहात

पिंपरी, (प्रतिनिधी) – चिखली येथील प्रज्ञानबोधिनी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वर्षारंभ उपासना समारंभ उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी वेद, उपनिषदे व गीते, अनेक श्लोक व मंत्र म्हटले. त्यांचा मराठीत अर्थ सांगण्यात आला. गायत्री मंत्राची उपासना करण्यात आली. विद्यार्थ्यांनी वर्षभरासाठी ठरवलेल्या संकल्पांचे सादरीकरण केले.
यावेळी संस्थेचे विश्वस्त उपेंद्र पाठक, खगोलशास्त्रज्ञ सोनल थोरवे, संस्थापक सचिव यादवेंद्र जोशी, अध्यक्ष मदनलाल कांकरिया, मुख्याध्यापिका अपर्णा गोवंडे, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
सोनल थोरवे म्हणाल्या, समाज माध्यमांपासून दूर राहिले पाहिजे. आई-वडिलांना मदत करा. इतरांना मदत करणे मोठा गुण आहे. प्लास्टिकचा कमी वापर व पर्यावरण रक्षण या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. याद्वारे आपण समाजासाठी उदाहरण घालून देत असतो.
उपेंद्र पाठक म्हणाले, प्रत्येक क्षेत्रामध्ये जाऊन तुम्ही संकल्प केले की अभिनंदन करण्याजोगी बाब आहे. केलेले संकल्प तडीस न्या. प्राचीन भारतात जी समृद्धी होती त्याचे कारण म्हणजे उपासना. सध्याच्या प्रदूषणाचा परिणाम माणसाच्या सर्व गोष्टींवर होतो.त्यापासून मुक्तता मिळवण्यासाठी अग्निहोत्र करणे हा चांगला मार्ग आहे. त्यामुळे पुढील 12 तास 500 चौरस फुटातील हवा शुद्ध राहू शकते.
यादवेंद्र जोशी म्हणाले, संकल्प करताना विद्यार्थ्यांनी मुक्त चिंतन करावे. कुठलीही गोष्ट मनाने स्वीकारल्यावर चांगली होते. संकल्प आतून यावेत. आत्मविश्वास निर्माण करावा. वर्षभर अधूनमधून संकल्प परत परत पहावेत व त्याचे उपयोजन करावे. आपण आधुनिकातले आधुनिक होऊ व परंपरा पाळण्यात सनातन्यातील सनातनी होऊ. विज्ञान ते अध्यात्म यात प्रगती करावी. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीता शिवतारे यांनी केले. कार्यक्रमासाठी रोहिणी खोत यांनी परिश्रम घेतले.





