Praful Patel : सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षा होणार; प्रफुल्ल पटेलांची घोषणा
अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाच्या नेतृत्वाबाबत सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून लवकरच पदभार स्वीकारणार असल्याची घोषणा पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी शुक्रवारी केली

Praful Patel : अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाच्या नेतृत्वाबाबत सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून लवकरच पदभार स्वीकारणार असल्याची घोषणा पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी शुक्रवारी केली. येत्या पंधरा दिवसांत त्यांच्या निवडीची औपचारिक प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
अजित पवारांच्या आकस्मिक जाण्याने पक्षात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी आणि संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या पदासाठी त्या एकमेव उमेदवार असून, पक्षातील सर्व स्तरांतून त्यांना पाठिंबा मिळत आहे.
सध्या आमचे सर्वोच्च प्राधान्य सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला पुन्हा उभारी देणे आणि संघटन अधिक मजबूत करणे हेच आहे, असे पत्रकारांशी बोलताना पटेल म्हणाले नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने दमदार कामगिरी केली आहे. पुणे जिल्हा परिषदेतील दणदणीत विजयासोबतच कोल्हापूर आणि अन्य जिल्हा परिषदांमध्येही पक्षाने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
या यशाच्या पार्श्वभूमीवर, आगामी काळात गावपातळीवरील कार्यकर्त्यांना बळ देऊन पक्षाचा पाया विस्तारण्यावर आमचा भर असेल, असे पटेलांनी नमूद केले.
दुसरीकडे, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) आणि राष्ट्रवादी यांच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर प्रफुल्ल पटेल यांनी भाष्य करणे टाळले. जरी सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत अशा चर्चांचा उल्लेख केला असला, तरी सध्या आमचे पूर्ण लक्ष केवळ पक्षाच्या अंतर्गत मजबूतीवर असल्याचे पटेलांनी म्हंटले.






