Praful Patel – राज्याच्या राजकारणात एक महत्त्वाची आणि वेगळी घडामोड समोर आली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी थेट संपर्क साधत तातडीने मुंबईला येण्याचा निरोप दिला आहे. या निरोपानंतर वळसे पाटील यांनी आंबेगाव तालुक्यातील आपले शुक्रवारी सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून तात्काळ मुंबईकडे प्रयाण केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाबाबत, तसेच उपमुख्यमंत्री पद आणि आगामी अर्थसंकल्पासंदर्भातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींवर शुक्रवारी रात्री मुंबईत निर्णायक बैठक होणार असल्याची माहिती आहे. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात असून त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्वात ज्येष्ठ आणि अनुभवी नेते मानले जातात. विधानसभा अध्यक्ष, गृहमंत्री, ऊर्जा यांसारखी अत्यंत जबाबदारीची पदे त्यांनी यशस्वीपणे सांभाळली असून प्रत्येक अडचणीच्या काळात पक्षाची प्रतिमा उज्ज्वल ठेवण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. पवार कुटुंबाशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध असून अभ्यासू आणि संयमी नेता अशी त्यांची राज्यभर ओळख आहे. गेल्या ३५ वर्षांहून अधिक काळ राज्याच्या राजकारणात सक्रिय असलेल्या वळसे पाटील यांनी विविध खात्यांची धुरा सांभाळत त्या खात्यांचा दर्जा उंचावण्याचे काम केले आहे. त्यामुळे सध्याच्या या महत्त्वपूर्ण घडामोडींमध्ये त्यांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. सर्व कार्यक्रम रद्द… शुक्रवारी संध्याकाळी व रात्रीचे सर्व कार्यक्रम वळसे पाटील यांनी रद्द केल्याची माहिती शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत होणाऱ्या राजकीय हालचालींकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.