Praful Patel : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? प्रफुल्ल पटेल यांचे सूचक वक्तव्य; म्हणाले…

मुंबई : मागच्या काही दिवसांपासून राज्यात दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रिकरणाची चर्चा रंगली आहे. जर दोन्ही पक्ष एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दोन्ही राष्ट्रवादींच्या महत्त्वाच्या नेत्यांकडून देण्यात आल्या आहेत. यादरम्यान अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि खा. प्रफुल पटेल यांनी राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणावर सूचक विधान केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?
प्रफुल्ल पटेल हे गोंदियाच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांना पत्रकारांनी दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रिकरणाविषयी विचारले असता त्यांनी यावर सूचक वक्तव्य केले. “असे महत्त्वाचे निर्णय हे प्रेससमोर घ्यायचे नसतात” असं चूक विधान प्रफुल्ल पटेल यांनी केलं. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, देशामध्ये सध्या महत्त्वाच्या विषय सुरू आहे. पाकिस्तान आणि भारतामध्ये तणावाची स्थिती आहे. अशा वेळेस आम्ही राष्ट्रवादी एकत्रित करण्याच्या मुद्द्यावर चर्चा करणे योग्य होणार नाही. हा मुद्दा महत्त्वाचा नसून सध्या देशहितासाठी देशात एकत्र येणं आम्हाला महत्त्वाचं आहे असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.
मागच्या अनेक दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येण्याचे आवाहन केले जाते. पवार घराण्यातील रोहित पवार यांनी तर दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येण्यावर विचार करावा, असे एक्स समाजमाध्यमाद्वारे जाहीरपणे बोलून दाखवलेले आहे. तर खासदार सुप्रिया सुळे यादेखील या एकत्रिकरणावर सकारात्मक आहेत. अजित पवार यांच्या पक्षातील काही नेत्यांनीही शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले तर आम्हाला आनंद होईल असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे आता दोन्ही राष्ट्रवादी पुढील काही दिवसांत एकत्र येणार का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.





