Pradeep Sharma : एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकल्याची मोठी बातमी समोर आली आहे. प्रदीप शर्मा हे मुंबई पोलीस दलातील माजी पोलीस अधिकारी आहेत. त्यांची एन्काउंटर स्पेशलिस्ट अशी ओळख बनलेली होती. त्यांच्या घरी आज आयकर विभागाने छापा टाकल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मनसुख हिरेन प्रकरणात प्रदीप शर्मा हे आरोपी होते. वर्षभर ते तुरुंगातही होते. त्यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिल्यानंतर ते तुरुंगातून बाहेर आले. प्रदीप शर्मा यांचे अंधेरीसह आणखी एका ठिकाणी निवासस्थान असून आयकर अधिकाऱ्यांकडून याठिकाणी छापा टाकण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका माजी आमदाराच्या प्रकरणामध्ये ही कारवाई सुरु असल्याची माहिती मिळत आहे. आयकर विभागाकडून या प्रकरणात काही ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरु आहे. या तपासादरम्यान घरातच प्रदीप शर्मा यांचे आयकर खात्याच्या अधिकाऱ्यांशी भांडण झाल्याचीही माहिती समोर आली आहे.
त्यामुळे आयकर खात्याने मदतीसाठी मुंबई पोलिसांना पाचारण केले आहे. प्रदीप शर्मा आणि आयकर खात्याच्या अधिकाऱ्यांचा वाद झाला. त्यानंतर घरातील महिलांमध्ये झटापट झाल्याचे समजते.
त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आता प्रदीप शर्मा यांच्या घरी सशस्त्र महिला पोलीस अधिकाऱ्याला बोलावण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी प्रदीप शर्मा आणि त्यांच्या पत्नीचा मोबाईलही जप्त केला आहे. दरम्यान, शर्मा यांच्या घरी धाड टाकून आठ तास उलटून गेले असून तपास मोहीमेतून काय निष्पन्न होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.