– अनामिका आपलं स्वत्व ही फार सुंदर अभिव्यक्ती आहे. ती प्रत्येकाने आपल्याला हवी तशी फुलवावी. जे आपल्याला आवडतं त्या छोट्या छोट्या गोष्टीदेखील मनाला हुरूप देतात. या अशा छोट्या छोट्या गोष्टींनाच वैशाख सरी म्हणावे. ज्या गोष्टी केल्याने आपला स्ट्रेस रिलीफ होतो, मनावरचा ताण हलका होतो, अशा गोष्टी आणि त्या म्हणजे हिरवळीवर अनवाणी चालण्यापासून ते लॉंग ड्राइव्हपर्यंतची, ज्यातून मन ताजंतवानं होईल अशी कोणतीही गोष्ट. त्याच त्याच सततच्या रुटीनला रोजच्या त्याच त्या माणसांना, गोष्टींना सामोरे जाताना मनं थकून जात बरेचदा. अशावेळी मनाला वेगळ्या वळणावर घेऊन जाणंच खऱ्या अर्थाने गरजेचं असतं. या भरभरून जगलेल्या क्षणांच्या वैशाख सरी तना-मनाचा दाह शांत करतात. उन्हाळ्याच्या काहिलीत फुलणारे, गुलमोहर, बहावा, नीलमोहर, आकाशनिम मनाला त्यांच्या बहरानं, रंगानं, सुवासानं मोहरून टाकतात. उन्हाच्या त्या काहिलीत देखील त्यांच्या बहरलेल्या पालवीने त्यांच्या पाकळ्यांच्या अलवारतेने सारा उन्हाचा तडाखा शांत होतो. मनानं जपलेल्या काही आठवणींच काही क्षणांचंदेखील असंच असावं बहुतेक म्हणून त्यांच्या हलक्याशा शिडकाव्यानंही मनाचा दाह कमी होतो. जाणारे क्षण कधीच परतून येत नाहीत. म्हणून हा प्रत्येक क्षण रंगवावा आपल्या आवडीनुसार. असे क्षण म्हणजे इंधन, ऊर्जा असतात जे आयुष्याला गती मिळवून देतात नव्या स्वप्नांना, ध्येयांना ऊर्जा देतात. जगणं सुखावह बनवतात. खूप काही असतं करण्यासारखं. आपण मात्र कारणांच्या बाहुल्या चिकटवत बसतो. कितीतरी स्वप्नं प्रत्यक्षात उभी राहतात ती या वैशाख सरींना मनात रुजवल्यामुळेच. कधी भर उन्हात बाहेर पडलात तर रस्त्याच्या कडेला फुललेला एखादा बहावा, पळस किंवा गुलमोहर पहा. आपल्या तजेलदार मोहरलेल्या बहरांची स्वप्ने घेऊन फुललेला तो एकसी बहावा. वाऱ्याच्या एका झुळकीबरोबर टपटपणारी त्याची फुले अलगद मातीत रेखतो. त्या फुलांच्या सकवार बहराचा थंडावा मातीला मिळतो. हा थंडावा देताना ती फुलं सुकण्याचा विचार करत नाहीत. तापलेल्या, उसासणाऱ्या धरतीला पाहून कोणी प्रवासी मेघ थपकतो. धरणीची आर्तता समजून घेऊन आपल्याकडच्या क्षणांचा, भर वैशाखातल्या एखाद्या तप्त दुपारी वर्षाव करतो. हा अमृत थंडावा म्हणजेच वैशाख सर. मग ती पावसाची असो, आनंदी क्षणाची असो की आवडत्या व्यक्तीची सहवासाची असो. या सरींत चिंब भिजावे.