– मधुरा धायगुडे
“काय कसे आहात तुम्ही?’ असा प्रश्न विचारल्यावर तुमच्या ओठांचे कोपरे कसे होतात यावर तुमची मनोवृत्ती ठरत असते. अर्थात, यात मीही आहेच. खरं तर असा प्रश्न विचारल्यावर तीन प्रकारे उत्तर अपेक्षित असते, एक तर सकारात्मक, नकारात्मक किंवा सर्वसाधारण असेच अपेक्षित मिळते.
आता “तुम्ही कसे आहात?’ हे विचारल्यावर वाईट, आजचा दिवस माझा नाही, अजिबात विचारूच नका, असा नकारात्मक प्रतिसाद असेल तर अशा मनोवृत्तीत लोक लांबच पळतील.
पण प्रतिसाद सर्वसाधारण असेल अर्थात, तुम्ही कसे आहात? यावर मी ठीक, अजून टिकून आहे, बरी आहे, अशा मध्यम स्वरूपाची उत्तरे देणारी व्यक्ती मध्यमच फळं मिळवते, सादाला प्रतिसाद मध्यमच. पण जर सकारात्मक प्रतिसाद असेल, उत्साही असाल, आनंदी असाल तर तुम्ही कसे आहात? विचारल्यावर लगेच म्हणाल, उत्तम, ग्रेट, छान. अशा व्यक्ती आनंदी असतात. नुसतं त्यांच्या अवतीभवती असण्यानेही खूप छान वाटते.
आपल्या दिसण्यात आपण काहीही फरक करू शकत नाही; पण सगळ्यात सकारात्मक उपाय म्हणजे चेहऱ्यावर सतत हास्य ठेवणं, जे तुमचं असणं एखाद्याला आनंद देऊन जातं. अर्थात, प्रत्येकाच्या आनंदाच्या संकल्पना वेगळ्याच असतीलही. पण “तुम्ही कसे आहात?’ ही एक सुरुवात जाणून घेण्यासाठीची ओळख “स्व’ची इतरांसाठीची असेच म्हणूयात.
तेव्हा “तुम्ही कसे आहात?’ या प्रश्नाचं उत्तर… “उत्तम’ असेच असण्याचा अट्टहास असावा, तरच तुमची आमची मनोवृत्ती कायम सकारात्मक राहते. सकारात्मकतेसाठी हेही करून बघितले तर काय हरकत. आपल्या बरोबर इतरांनाही आनंद. सकारात्मक स्पंदने अवतीभवती आनंदच आनंद. सहज मनात डोकावले ते मांडले. शेवटी सगळे तुमच्या मनोवृत्तीवरच.
शब्द हे माणसांजवळील अत्यंत सामर्थ्यशाली औषध, उतारा असेच काहीसे. ओळखीतही अनोळखी करणारे तर अनोळखीतही आपलेसे वाटणारे हे शब्द उत्तर होऊन… “काय तुम्ही कसे आहात?’ यावर उत्तरित होतील आनंदाने…