पुणे -समाजाप्रती आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून, समर्पित वृत्तीने, स्वान्तसुखाय कार्य करत राहणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा हृद्य सन्मान सोहळा शुक्रवारी (दि. 10) सायंकाळी बालगंधर्व रंगमंदिरात रंगला. दैनिक “प्रभात’च्या वतीने आयोजित करण्यात आलेला “प्रभात नारीसन्मान 2023′ सोहळा अतिशय नेटकेपणाने आणि संगीतमय वातावरणात आयोजित करण्यात आला. वेगवेगळ्या क्षेत्रांत कर्तृत्वाबरोबर सामाजिक बांधीलकी जपणाऱ्या या महिलांचे कार्यकर्तृत्व ऐकताना, पाहताना अनेक जण नतमस्तक झालेच, शिवाय टाळ्यांचा कडकडाट करून त्यांच्या कामाची पोहोचपावतीही दिली. “माणिकचंद ऑक्सिरीच’ प्रस्तुत या कार्यक्रमाला “महेश नागरी मल्टिस्टेट को-ऑप सोसायटी लि. पुणे’, “प्रकाश मसाले-मसाला महाराष्ट्राचा’, “वैद्य नानल्स आयुर्वेद’ यांचे सहप्रायोजकत्व लाभले होते. याशिवाय डिजिटल पार्टनर -डिजिटल प्रभात यांचेदेखील सहप्रायोजकत्व होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला “वैद्य नानल्स आयुर्वेद’च्या वैद्य सुप्रिया विलास नानल, “प्रकाश मसाले- मसाला महाराष्ट्राचा’चे बाबासाहेब जाधव, पवन जाधव आणि “दैनिक प्रभात’च्या संचालिका वृषाली गांधी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर “प्रकाश मसाले-मसाला महाराष्ट्राचा’च्या शारदा जाधव आणि अर्पिता जाधव, “वैद्य नानल्स आयुर्वेद’च्या सुप्रिया नानल, महेश नागरी मल्टिस्टेट को-ऑप. सोसायटी लि.च्या जनरल मॅनेजर माधवी भोंडवे यांचा सत्कार करण्यात आला. या सोहळ्याला “दैनिक प्रभात’ वृत्तपत्र समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आनंद गांधी, दै. “प्रभात’चे अध्यक्ष डॉ. हर्षद गांधी, सरव्यवस्थापक बी. एल. स्वामी आदी यावेळी उपस्थित होते. दैनिक “प्रभात’चे कार्यकारी संपादक अविनाश भट यांनी प्रास्ताविक केले. श्रीनिवास वारुंजीकर यांनी आभार मानले. सूत्रसंचालन खरे यांनी केले. 12 जणींना “सुपर वुमन’ पुरस्कार “प्रभात नारीसन्मान 2023′ सोहळ्याच्या सुरुवातीला सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या सांगीतिक प्रवासावरील “आशा दि व्हर्सेटाइल लिजंड’ हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमामधूनच थोडासा “ब्रेक’ घेऊन नारीसन्मान सोहळा झाला. यामध्ये सामाजिक कार्य करणाऱ्या मालती दाते आणि साताऱ्याच्या डॉ. पल्लवी साठे-पाटोळे, “पुणे विभागीय अवयव प्रत्यारोपण समिती’च्या समन्वयक आरती गोखले, देवदासींच्या आरोग्यासाठी कार्य करणाऱ्या अलका गुजनाळ आणि बालगुन्हेगारी समुपदेशक म्हणून कार्य करणाऱ्या भाग्यश्री साळुंखे यांचा “सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशन’च्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांच्या हस्ते “प्रभात नारीसन्मान 2023′ देऊन सन्मान करण्यात आला. याशिवाय 12 जणींना “सुपर वुमन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये जयश्री सातव-पाटील, उज्ज्वला बांदल, डॉ. कल्याणी गेलडा, वैद्य उषा आशुतोष नानल, आशा भोंग, राजश्री-प्रीती-श्रद्धा, शुभांगी लोणकर, नंदिता शहा, डॉ. प्रियंका महाजन-राऊत, कल्याणी वाघमोडे, सुप्रिया बांदल, वैशाली जगदाळे यांचा समावेश होता. या पुरस्काराच्या वितरणानंतर “आशा दि व्हर्सेटाइल लिजंड’चा उर्वरित कार्यक्रम पार पडला.