प्रभात इफेक्ट..! रात्रीतच उरकले रस्त्याचे काम; प्रभातच्या वृत्तानंतर प्रशासनाची तातडीने कारवाई

पुणे : रस्त्याच्या कामासाठीचा अंदाजपत्रकातील निधी संपल्याने शहराच्या मध्यवर्ती भागातील नदीपात्रातून जाणाऱ्या राजपूत झोपडपट्टी ते भिडे पूल रस्त्याचे काम अर्धवटच केल्याचा प्रकार दैनिक प्रभातने समोर आणला होता. त्याची गंभीर दखल घेत महापालिका प्रशासनाकडून एका रात्रीत या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे खरंच निधी संपला होता का? की ३१ मार्चपूर्वी संबंधित ठेकेदारांची बिले देण्यासाठी हे काम अर्धवटच ठेवण्यात आले, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागाला पश्चिम उपनगरांशी जोडणारा नदीपात्रातील भिडे पूल, तर राजपूत झोपडपट्टी हा महत्त्वाचा रस्ता आहे. हा रस्ता केवळ दुचाकीसाठी असल्याने कर्वेनगर, कोथरूड, सेनापती बापट रस्ता, सिंहगड रस्ता, पौड रस्ता या भागांतून मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहने येतात, तसेच पेठांममधून या भागाकडे जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर होतो. त्यामुळे दिवसभरात तीन ते साडेतीन लाख दुचाकी वाहने या रस्त्याने प्रवास करतात.
त्यामुळे हा रस्ता महत्त्वाचा आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी त्याची दुरुस्ती करणे आवश्यक होते. त्यासाठी महापालिकेने काढलेल्या निविदेमधून अर्धवटच काम झाल्याने या रस्त्यावर वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. ही बाब समोर आल्यानंतर महापालिकेच्या पथ विभागाने रात्रीत या अर्धवट रस्त्याचे काम पूर्ण केले आहे. याशिवाय उर्वरीत रस्त्यावर पुढील काही दिवसांत दुसरा थर टाकण्यात येणार असल्याचे पथ विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.





