पुणे – महापालिकेकडून ‘जी-20′ परिषदेसाठी सेनापती बापट रस्त्यावर रत्ना हॉस्पिटलसमोर तयार केलेल्या “रेज्ड क्रॉसिंग’मधील दुभाजकाचा अडथळा महापालिकेने मंगळवारी रात्रीत दूर केला. नागरिकांना आता हा पादचारी मार्ग सुरक्षितपणे वापरता येणार आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूने “रेज्ड क्रॉसिंग’ तयार केल्यानंतर संबंधित ठेकेदाराने दुभाजक तसेच ठेवले होते. तर ज्या भागात दुभाजक काढले तिथे “रेज्ड क्रॉसिंग’ न करता शेजारच्या जागेत केले होते. त्यामुळे पादचाऱ्यांना या “रेज्ड क्रॉसिंग’चा वापर करता येत नव्हता. या चुकीच्या कामाचा कारभार दैनिक “प्रभात’ने उघडकीस आणला होता. त्याची दखल घेत महापालिकेने रातोरात या “रेज्ड क्रॉसिंग’ची चूक सुधारली असून, तो नागरिकांना चालण्यासाठी उपलब्ध करून दिला आहे “रेज्ड क्रॉसिंग’चा गोंधळ सर्वसाधारणपणे मुख्य आणि वर्दळीच्या चौकांमध्ये मुख्य रस्त्यावर दोन चौकांत 250 मीटरपर्यंतच्या अंतरात हे क्रॉसिंग बसविले जातात. शाळा, दवाखाने, अथवा बाजारपेठेचा रस्ता असलेल्या भागात हे क्रॉसिंग बसवितात. “जी-20′ परिषदेसाठी शहरातील रस्त्याचे सुशोभीकरण केले जात असल्याने महापालिकेने सेनापती बापट रस्त्यावरील रत्ना हॉस्पिटलच्या समोर हे क्रॉसिंग तयार केले आहे. चौकात असलेले क्रॉसिंग हे रस्त्याच्या समपातळीत असतात. तसेच त्यावर झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे असतात. तर “रेज्ड क्रॉसिंग’ रस्त्याच्या दोन्ही बाजूंना जोडणारे तसेच पदपथाच्या उंचीएवढे असतात. तसेच सुमारे अडीच मीटर रूंद असतात. त्यामुळे ते स्पीड ब्रेकरसारखे काम करतात. तसेच पादचाऱ्यांना मध्यभागातून सहज चालता येते. रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या पदपथांना हे क्रॉसिंग असल्याने ते सरळ असतात. त्यामुळे रस्ता दुभाजकही काढणे आवश्यक असते. रत्ना हॉस्पिटलसमोर हा क्रॉसिंग तयार करून त्यावर पांढऱ्या रंगाचे पट्टे मारून तयार केला होता. मात्र दुभाजक न काढताच तो तसाच सोडून देण्यात आला होता. त्यामुळे नागरिकांना त्याचा वापर करता येत नव्हता.