प्रभात अर्थजगत! महिलादिनी शिव नादर यांनी मुलीला दिली खास भेट, सरलेल्या आठवड्यात शेअर निर्देशांकांत वाढ, इलेक्ट्रिक वाहन विक्रीत टाटा मोटर्स आघाडीवर, मुंबईत होणार वेव्हज परिषद….

प्रवासी रिटेल इलेक्ट्रिक वाहन विक्री वाढली; इलेक्ट्रिक वाहन विक्री टाटा मोटर्स आघाडीवर
नवी दिल्ली – भारतात प्रवासी इलेक्ट्रिक वाहन विक्री हळूहळू वाढत असल्याचे दिसून येत आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये प्रवासी रिटेल इलेक्ट्रिक वाहन विक्री 19 टक्क्यांनी वाढली. या विक्रीत वितरकांनी ग्राहकांना विकलेल्या वाहनांचा समावेश केला जातो. प्राप्त माहितीनुसार फेब्रुवारी महिन्यामध्ये 8,968 इलेक्ट्रिक प्रवासी वाहनांची विक्री झाली. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये 7,539 इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली होती.
प्रवासी इलेक्ट्रिक वाहन विक्रीत टाटा मोटर्स आघाडीवर असून टाटा मोटर्सने फेब्रुवारी महिन्यात 3,825 वाहनांची विक्री केली. एमजी मोटार इंडिया या कंपनीने 3,270 इलेक्ट्रिक वाहनांची विक्री केली.
फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष सी एस विघ्नेश्वर यांनी सांगितले की, आता भारतीय ग्राहक वैयक्तिक वापरासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करू लागले आहेत. त्यामुळे उत्सर्जन कमी होते. याबाबत योग्य वातावरण निर्मिती झाली आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यामध्ये इलेक्ट्रिक वाहन विक्रीत समाधानकारक वाढ झाली असल्याचे दिसून येते. आता एकूण वाहन विक्रीत इलेक्ट्रिक वाहनांचे प्रमाण तीन टक्क्यावर आले आहे.
इलेक्ट्रिक तीन चाकी वाहनांची विक्री फेब्रुवारी महिन्यात पाच टक्क्यांनी वाढून 53,616 युनिट झाली आहे. तर इलेक्ट्रिक व्यवसायिक वाहनांची विक्री एक टक्क्याने वाढून 856 झाली आहे. आता एकूण व्यावसायिक वाहनात इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहनांचे प्रमाण 1% वर आले आहे. आगामी काळात ते वेगाने वाढण्याची शक्यता जास्त आहे. इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वाढविण्यासाठी केंद्र सरकार काही प्रमाणात अनुदान देते. याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.
दुचाकीच्या विक्रीवर परिणाम
दरम्यान वाहनाची उपलब्धता आणि इतर कारणामुळे दुचाकीची विक्री 8 टक्क्यांनी कमी होऊन 76,06 युनिट वर आली आहे. मात्र हा केवळ अपवाद आहे आणि आगामी काळात ही विक्री वाढत राहण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात 82,745 दुचाकी वाहनांची विक्री झाली होती. या क्षेत्रात बजाज ऑटो आघाडीवर असून या कंपनीची 21,389 वाहने फेब्रुवारी महिन्यात विकली गेली. इलेक्ट्रिक वाहनांचे एकूण वाहनातील प्रमाण वाढून आता 5.6% वर गेले असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
मुंबईत होणार वेव्हज परिषद
मुंबई – केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने येत्या मे महिन्यात मुंबईत जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजनाच्या वेव्हज या शिखर परिषदेचं आयोजन होणार आहे. या परिषदेच्या आयोजनाबाबत उद्योग विभागातर्फे आज मुंबईत एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांची प्रमुख उपस्थिती होती.
येत्या 1 ते 4 मे दरम्यान मुंबईत होणार्या परिषदेत चित्रपट, टीव्ही, ब्रॉडकास्ट, प्रिंट, रेडिओ, वृत्तपत्रं, नवीन मीडिया, जाहिरात, निमेशन, व्हीएफएक्स, गेमिंग, ई-स्पोर्ट्स, संगीत, लाइव्ह इव्हेंट्स इत्यादी मनोरंजनाशी संबंधित सर्व उद्योग क्षेत्रांवर भर देण्यात येईल, अशी माहिती संजय जाजू यांनी या बैठकीत दिली. या पार्श्वभूमीवर या परिषदेची नियोजनबद्ध तयारी सर्व विभागांनी समन्वयातून करावी अशा सूचना राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिल्या.
————-
नवे तंत्रज्ञान स्वीकारत रहा
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा बँकांना सल्ला
मुंबई – जागतिक आणि देशांतर्गत पातळीवर बँकिंग क्षेत्रासंदर्भात नवी आव्हाने उभी राहत आहेत. या आव्हानाचा सामना नाविन्यपूर्ण उत्पादने विकसित करत बँकांनी करावा, असा सल्ला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकांना दिला आहे.
भारतीय बँका आगामी काळात नवे तंत्रज्ञान वापरतील, शाश्वत विकास होईल, या दृष्टिकोनातून प्रयत्न करतील. त्याचबरोबर सर्व समावेश विकासाकडे लक्ष देतील अशी अपेक्षा सितारामन यांनी व्यक्त केली. भारतातील सर्वात मोठीे बँक म्हणजे स्टेट बँक या नव्या बाबीचा स्वीकार करून या क्षेत्रात आघाडीवर राहील याबद्दल आपल्याला खात्री असल्याचे सितारामन म्हणाल्या.
स्टेट बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना सितारामन यांनी सांगितले की, काळाच्या ओघात स्टेट बँकेने स्वतः आवश्यक बदल केले आहेत. नियंत्रणे वाढली तरीही स्टेट बँकेने स्वतःमध्ये बदल करून या क्षेत्रात आपले नेतृत्व कायम ठेवले आहे.
स्टेट बँकेची स्थापना एक जलै 1955 रोजी झाली. आता बँकेचे 51 कोटी ग्राहक आहेत. बँकेत एकूण 2.37 लाख कर्मचारी असून बँकेचा एकूण व्यवहार 87 लाख कोटी रुपयांवर गेला आहे.
स्टेट बँकेच्या कामाची स्तुती
स्टेट बँक ही भारतातील सर्वात मोठी बँक आहे. जगातील 5.6% लोकसंख्येला स्टेट बँकिंग सेवा देते. काळाच्या ओघात या बँकेने दर्जावर परिणाम न होऊ देता भारतीय नागरिकांना बँकिंग सुविधा उपलब्ध केल्या आहेत. त्यामुळे भारताच्या विकास गाथेमध्ये स्टेट बँकेचे मोलाचे योगदान आहे. नवे तंत्रज्ञान स्वीकारणे, त्यासाठी मनुष्यबळाला कुशल करण, इत्यादी कामात स्टेट बँकेने आवश्यक ती प्रगती केली आहे, असे त्या म्हणाल्या.
00000000
अमेरिकेला हवी कृषी उत्पादनाची बाजारपेठ
भारत -अमेरिका व्यापार करारात अडथळे येण्याची शक्यता
नवी दिल्ली, – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतल्यानंतर दोन्ही देशांनी व्यापार करार करून दोन्ही देशादरम्यानचा व्यापार दुपटीने वाढवून 500 अब्ज डॉलर करण्याचा संकल्प केला आहे. दोन्ही देशाचे वाणिज्य विभागातील अधिकारी परस्परात चर्चा करीत आहेत. मात्र अमेरिकेला भारतातील कृषी उत्पादनाची बाजारपेठ हवी आहे असे समजले जाते. भारत या विषयावर सहजासहजी तडजोड करण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे या आघाडीवर अडथळे निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
2023 मध्ये भारताने अमेरिकेला 83.77 राज्य डॉलरच्या वस्तूची निर्यात केली. तर 40.12 अब्ज डॉलरची आयात केली. त्यामुळे भारताने आयातीपेक्षा 43.65 अब्ज डॉलरची निर्यात जास्त केली आहे. हे व्यापारातील संतुलन भारत जास्त आयात शुल्क आकारत असल्यामुळे निर्माण झाले आहे असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे.
आता अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लूटनिक यांनी सांगितले की, केवळ काही वस्तू आणि सेवा संदर्भात भारत आणि अमेरिकेने व्यापार करारावर चर्चा करून काही उपयोग नाही. दोन्ही देशांदरम्यान स्थूल पातळीवर सर्वसमावेशक व्यापार करार होण्याची गरज आहे. तसेच कृषी उत्पादनाला भारत सरकारने अपवाद करून इतर विषयावर चर्चा करण्यात काही अर्थ नाही. या चर्चेत कृषी उत्पादनांचा समावेश व्हावा असे अमेरिकेचे म्हणणे आहे.
मात्र भारतातील 50% लोकांची उपजीविका कृषी क्षेत्रावर आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेतील दूध आणि कृषी उत्पादने भारतात कमी किमतीत आल्यास भारतीय शेतकर्यावर याचा परिणाम होतो. हा विषय संवेदनाशील आणि राजकीय होतो. त्यामुळे भारत सरकार अमेरिकेची ही अट सहजासहजी मान्य करणे शक्य नाही. या अगोदर ज्या देशाबरोबर व्यापार करार झालेला आहे त्यामध्ये भारताने कृषी क्षेत्राला अपवाद केलेले आहे.
पियुष गोयल परतले
दरम्यान वाणिज्य मंत्री पियुष गोयल आठवडाभराच्या अमेरिका भेटीनंतर भारतात परत आले आहेत. त्यांनी अमेरिकेचे वाणिज्य मंत्री हॉवडर्र् लूटनिक आणि व्यापार प्रतिनिधी हेमीसेन ग्रीर यांच्याशी चर्चा केली आहे. दोन्ही देशांदरम्यान अधिकारी पातळीवर बरेच महिने ही चर्चा होण्याची शक्यता आहे. या वर्षाच्या अखेरीस अशा प्रकारचा करार व्हावा अशी दोन्ही देशांच्या प्रमुखांची इच्छा आहे. मात्र एकूण गुंतागुंत पाहता हा करार सहजासहजी होण्याची शक्यता कमी आहे. त्यातच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प खर्या आकडेवारीऐवजी अतिशोक्तीपूर्ण आकडेवारी पुढे करून भारताविरोधात वक्तव्य करीत आहेत.
000000
रोशनी मल्होेत्रा यांच्याकडे एचसीएल टेक्चे सर्वाधिक भांडवल
महिलादिनी शिव नादर यांनी मुलीला दिली खास भेट
नवी दिल्ली – एचसीएल टेक्नॉलॉजी कंपनीचे अब्जाधीश संस्थापक शिव नादर यांनी एचसीएल कार्पोरेशन आणि वामा दिल्ली या कंपन्यातील आपल्याकडील 47 टक्के भाग भांडवल आपली कन्या रोशनी नादर मल्होत्रा यांना भेट म्हणून दिले आहे. त्यामुळे आता या दोन्ही कंपन्यांमध्ये रोशनी यांचे सर्वाधिक भागभांडवल झाले आहे आणि त्या या कंपन्यांच्या सर्वेसर्वा झाल्या आहेत.
ही भेट देण्यापूर्वी या कंपन्यात शिव नादर यांचे 51 टक्के तर रोशनी यांच्याकडे 10.33% भाग भांडवल होते. आता आपल्या वाटयातील 47 टक्के भाग भांडवल शिव नादर यांनी रोशनी यांना दिल्यामुळे रोशनी यांच्याकडे 50 टक्के पेक्षा जास्त भाग भांडवल झाले आहे. यासंदर्भात या कंपन्यांनी शेअर बाजारांना माहिती कळविली आहे. खुल्या बाजारातून शेअर घेण्याऐवजी भेट म्हणून हे शेअर घेण्यास बाजार नियंत्रक सेबीने या अगोदर परवानगी दिली आहे. त्यामुळे हा व्यवहार पूर्ण झाला आहे.
000000
सरलेल्या आठवड्यात शेअर निर्देशांकांत वाढ
आगामी काळात निर्देशांकासमोर अडथळे कायम
मुंबई – अपवाद म्हणून का होईना सरलेल्या आठवड्यामध्ये भारतीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात 2% पर्यंत वाढ झाली. मात्र देशातील आणि परदेशातील नकारात्मक परिस्थितीमुळे आगामी काळात शेअर बाजार निर्देशांकासमोर अडथळे कायम राहणार आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार सावध राहून व्यवहार करण्याची शक्यता जास्त आहे.
सरलेल्या आठवड्यात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 1,134 अंकांनी म्हणजे 1.55 टक्क्यांनी वाढून 74,332 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी या आठवड्यात 427 अंकांनी म्हणजे 1.93 टक्क्यांनी वाढून 22,552 अंकांवर बंद झाला.
एफआयआयकडून विक्री
सरलेल्या आठवड्यातही परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी विक्री थांबविली नाही. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यापासून या गुंतवणूकदारांनी केलेली विक्री 3 लाख कोटी रुपयांवर गेली आहे. डॉलर बळकट होणे, रुपया घसरणे आणि जागतिक व्यापार युद्ध या कारणामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी भारतातून विक्री केली. मात्र आता खनिज तेलाचे दर कमी होत आहेत. त्याचबरोबर डॉलर कमकुवत होत आहे. अशा परिस्थितीत परदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारबाबत काय भूमिका घेतात याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. जानेवारी 2024 मध्ये या गुंतवणूकदारांची शेअर बाजारात 77.96 लाख कोटींची गुंतवणूक होती. ती आता 62.38 लाख कोटी रुपयावर आली आहे.
0000000
रिलायन्सचा शेअर कोसळल्याने गुंतवणूकदारांचे नुकसान
मुंबई – आठ जुलै 2024 रोजी रिलायन्स कंपनीच्या शेअरचा भाव 1,608 रुपये होता. त्यामध्ये आता 25% घट झाली आहे. या कालावधीत या कंपनीचे बाजार मूल्य 5.4 लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे.
जानेवारी 2024 पासून निफ्टीपेक्षा रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर दहा टक्क्यांनी कमी पातळीवर आहे. गेल्या आठवड्यात सकारात्मक वातावरणामुळे रिलायन्स इंडस्ट्रीच्या शेअरचा भाव चार टक्क्यांनी वाढला आहे. मात्र ही वाढ आगामी काळात कायम राहील की नाही याबाबत शंका आहेत.रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरचा भाव कमी होत असल्यामुळे आता किरकोळ गुंतवणूकदारांनीही या शेअरची बरीच विक्री केली आहे. गुंतवणूकदारांनी या कंपनीच्या शेअरची विक्री केल्यामुळे शेअर कमी झाला असल्याचे दिसून येते.
जेफरीज या ब्रोकरेज संस्थेने दीर्घ पल्ल्यात या कंपनीचा शेअर नफादायक ठरेल असे म्हटले असून टारगेट प्राईस 1,660 रुपये प्रति शेअर सांगितली आहे. ऑक्टोबर पासून शेअर बाजारात झालेल्या विक्रीचा परिणाम रिलायन्स इंडस्ट्रीज बरोबर इतरही ब्ल्यूचीप कंपन्यावर झाला आहे. मात्र गेल्या आठवड्यामध्ये करेक्शन पूर्ण झाले असल्याची भावना काही गुंतवणूकदारांच्या मनात निर्माण झाल्यामुळे बरीच खरेदी झाली होती.
000000
भारतातील अतिश्रीमंतांच्या संख्येत वाढ
मुंबई – सरलेल्या 2024 वर्षांमध्ये भारतातील अति श्रीमंतांची संख्या सहा टक्क्यांनी वाढली आहे. आगामी काळात म्हणजे 2028 पर्यंत भारतातील अति श्रीमंत लोकांची संख्या वाढवून 9,3758 पर्यंत जाण्याची शक्यता नाईट फ्रँक या संस्थेने संकलित केलेल्या आकडेवारीच्या विश्लेषणात व्यक्त करण्यात आली आहे.
या अहवालात म्हटले आहे की, अति श्रीमंत म्हणजे ज्यांचे उत्पन्न 10 दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त आहे अशा लोकांची संख्या 2024 मध्ये सहा टक्क्यांनी वाढून 85,698 इतकी झाली आहे. याच कालावधीत ज्यांचे उत्पन्न एक अब्ज डॉलर पेक्षा जास्त आहे, अशा व्यक्तींची भारतातील संख्या 12 टक्क्यानी वाढून 191 इतकी झाली आहे.
भारतातील अति श्रीमंताकडील संपत्ती 950 अब्ज डॉलर असून भारत या यादीत तिसर्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावरील अमेरिकेतील अति श्रीमंतांकडील संपत्ती 5.7 लाख कोटी डॉलर आहे. तर चीनकडीला अति श्रीमंतांची संपत्ती 1.34 लाख कोटी डॉलर आहे.
जागतिक पातळीवर मंदीचे वातावरण असूनही अमेरिकेत मात्र शेअर बाजाराचे निर्देशांक सरलेल्या वर्षात मोठ्या प्रमाणात वाढले. त्याचबरोबर अमेरिकेत बिटकॉइन मधील गुंतवणूक वाढत आहे. यामुळे जगातील इतर देशातील अति श्रीमंतांच्या तुलनेत अमेरिकेतील अति श्रिमंतांच्या संपत्तीत जास्त प्रमाणात वाढ झाली आहे. दरम्यान शेअर बाजाराचे निर्देशांक कोसळत असल्यामुळे भारत आणि चीनसारख्या देशांमधील श्रीमंत लोक शेअर बाजाराऐवजी सोने आणि रिअल इस्टेटमध्ये अधिक प्रमाणात गुंतवणूक करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या संपत्तीत वाढ होत आहे.
000000
सॅमसंगमधील कर्मचार्यांचा संप समाप्त
चेन्नई – सॅमसंग इंडिया कंपनीच्या तामिळनाडूतील श्रीपेरुंबुदुर येथील प्रकल्पातील कर्मचार्यांनी अनेक दिवसांपासून आपल्या विविध मागण्यासाठी संप सुरू केला होता. आता या कर्मचार्यांनी संप समाप्त केला असल्याची माहिती देण्यात आली. हे सर्व कर्मचारी टप्प्याटप्प्याने कामावर रुजू होणार असल्याचे सांगण्यात आले.
कंपनीने म्हटले आहे की, आम्ही कर्मचार्यांशी थेट चर्चा करून त्यांच्या विविध मागण्याबद्दल विचार करण्यास तयार आहोत. कंपनीच्या व्यवस्थापनाने सांगितले की, मुळात हा संप बेकायदेशीर होता. कर्मचार्यांनी संप परत घेतल्यामुळे हे कर्मचारी लवकरच कामावर रुजू होतील आणि उत्पादन सुरू होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे.
संप करणार्या कर्मचार्या विरोधात अगोदर कंपनीने कडक भूमिका घेतली होती. मात्र आता ही भूमिका मवाळ केली असून संप करणार्या काही कर्मचार्यांना वगळता इतर सर्व कर्मचार्यांना कामावर घेण्यास कंपनीने होकार दिला आहे. मात्र या अगोदरच निलंबित केलेल्या काही कर्मचार्याबाबत कंपनी नंतर विचार करणार असल्याचे सांगण्यात येते.
थेट संवाद साधणार
कंपनीने म्हटले आहे की, आम्ही कर्मचार्याच थेट संवाद साधून त्यांच्या मागण्यावर विचार करण्यास तयार आहोत. कंपनीमध्ये सकारात्मक वातावरण निर्मिती व्हावी अशी आमची इच्छा आहे. मात्र बाह्य शक्तीशी आम्ही चर्चा करणार नाहीत असे कंपनीने पुन्हा स्पष्ट केले आहे. कंपनी पुन्हा कर्मचार्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना टप्प्याटप्प्याने कामावर घेणार आहे. लवकरच पूर्ण क्षमतेने उत्पादन सुरू होण्याची आशा कंपनीने व्यक्त केली आहे.
0000000
भारतीय कंपन्यांना 120 लाख कोटी रुपयाच्या कर्जाची गरज
मुंबई – भारतीय कंपन्यांना आर्थिक वर्ष 2030 पर्यंत भांडवली गुंतवणूक आणि खेळत्या भांडवलासाठी 120 लाख कोटी रुपयांच्या कर्जाची गरज पडणार असल्याचे क्रिसिल या पतमानांकन करणार्या संस्थेने म्हटले आहे.
ही रक्कम या कंपन्या बँका आणि एनबीएफसीकडून उभी करण्याची शक्यता आहे. 40 ते 50 लाख कोटी रुपये भांडवली खर्चासाठी लागणार आहेत. कारण सध्या पायाभूत सुविधा विकसित करण्यावर केंद्र सरकारने आणि खासगी कंपन्यांनी भर दिला आहे. 70 ते 75 लाख कोटी रुपये खेळत्या भांडवलासाठी लागणार आहेत.
आता भारतातील पायाभूत सुविधा क्षेत्र अतिशय वेगाने आगेकूच करीत आहे. केंद्र सरकारने गेल्या दहा वर्षापासून पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये प्रचंड गुंतवणूक केली आहे. त्यामुळे विकास दर वाढण्यास मदत होत आहे. केंद्र सरकारचे प्रकल्प खासगी कंपन्यांच्या माध्यमातून काही प्रमाणात राबविले जातात. त्यामुळे खासगी कंपन्यांनाही भांडवल उभरावे लागणार आहे. आतापर्यंत खासगी कंपन्यांनी भांडवली गुंतवणूक किंवा खेळत्या भांडवलासाठी कमी प्रमाणात कर्ज घेतले होते. कारण करोना व नंतरच्या मंदीमुळे या कंपन्या सावध होत्या. मात्र आता परिस्थिती बदलत आहे आणि या कंपन्याकडून भांडवलाचा वापर वाढविण्याची शक्यता आहे.





