62 वर्षांपूर्वी प्रभात : अणुशक्ती, युद्ध आणि नेहरू

अणुशक्ती, युद्ध आणि नेहरू
अलाहाबाद, ता. 21 – अलाहाबाद विद्यापीठाच्या खास पदवीदान प्रसंगी भाषण करताना पंतप्रधान श्री. नेहरू म्हणाले की, अणुशक्तिप्रधान युगात आपण जगातल्या इतर राष्ट्रांबरोबरीने असणे आवश्यक आहे. ते पुढे म्हणाले की, अणुशक्ती परवडेल की नाही अशी शंका घेण्यात येते. पण येत्या पाच-सहा वर्षांत अणुशक्ती प्रमुख शक्ती बनणार आहे.
अनपेक्षित आपत्तीने नष्ट झाली नाही तर जगात नवीन संस्कृतीची घडण लवकरच होईल. युद्धाने युद्ध करण्याचा हेतू साध्य होईल असे नाही. अणुशक्तीच्या काळात युद्ध करणे महामूर्खपणाचे आहे हे कळूनही शीतयुद्ध चालूच आहे. आपण युद्धात लुडबुडणार नाही हे निर्धारपूर्वक सांगता येईल.
पुणे ते भीमाशंकर एस. टी. गाडी चालू होणार
घोडेगाव – मुंबईचे व ग्रामीण भागांतील लोकांचे मागणीवरून पुणे-भीमाशंकर एस. टी. बस सर्व्हिस
1 तारखेपासून सुरू होणार आहे. श्रीक्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असून पुणे, मुंबई, मद्रास वगैरे भागांतून तीर्थयात्रेसाठी लोक येथे येत असतात.
रॉकेलची तीव्र टंचाई सरकारला कळली आहे!
मुंबई – रॉकेल तेलाच्या टंचाईमुळे होत असलेली गैरसोय दूर करण्याच्या दृष्टीने सरकार उपाययोजना करण्याचा विचार करते आहे, असे मुंबईचे पुरवठा खात्याचे मंत्री एस. जी. काझी यांनी सांगितले.
ते म्हणाले की, रॉकेलच्या टंचाईचा प्रश्न आमच्या ध्यानी आला आहे. ह्या प्रश्नाचा विचार करण्यासाठी कंपन्यांच्या प्रतिनिधींना सरकारने बोलावले होते. तेलाचा पुरवठा नित्याप्रमाणे ठेवण्याचे आश्वासन कंपन्यांनी दिले आहे.
ऐकू न येणाऱ्यांसाठी श्रवणसौख्य देणारे यंत्र
नवी दिल्ली – येथील राष्ट्रीय पदार्थविज्ञान प्रयोगशाळेच्या रेडिओ सर्किट्स डेव्हलपमेंट ग्रुपने एकाचवेळी बारा बहिऱ्या विद्यार्थ्यांस ऐकू जाण्याची सोय असलेले एक यंत्र “ग्रुप हिअरिंग एड’ तयार केले असल्याचे समजते.
तेथील लेडी नॉइस स्कूल फॉर डेफ अँड डम्ब या संस्थेत हे यंत्र बसविण्यात आले असून त्यामुळे अनेक बहिऱ्या विद्यार्थ्यांस ऐकू जाण्याची सोय झाली आहे. या यंत्रात सात मायक्रोफोन व त्यामागे एक ऍम्लिफायर असतो.





