Om Trailer : धनुषच्या OM चा दमदार ट्रेलर रिलीज! बॅालिवूडच्या या प्रसिद्ध कलाकाराची दिसली झलक
Om Trailer : ट्रेलरमधील अॅक्शन, थरार आणि कलाकारांच्या दमदार भूमिका यामुळे चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.

Om Trailer : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता धनुष सध्या त्याच्या आगामी ‘ओम चॅप्टर १: उधिरम – द ब्लड वूड’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर या चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, सोशल मीडियावर त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
ट्रेलरमधील अॅक्शन, थरार आणि कलाकारांच्या दमदार भूमिका यामुळे चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. ‘ओम चॅप्टर १’ची कथा लाल चंदनाच्या तस्करीच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. या चित्रपटात धनुष एका लाकूडतोड्याची भूमिका साकारत आहे. परिस्थितीमुळे तो हळूहळू लाल चंदनाच्या तस्करीच्या धोकादायक जगात अडकतो. त्यानंतर गुन्हेगारी विश्वातील संघर्ष, सत्ता आणि जीवघेण्या घडामोडींचा थरार चित्रपटात पाहायला मिळणार असल्याची झलक ट्रेलरमधून पाहायला मिळते.
या चित्रपटात धनुषसोबत अनेक दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. अभिनेत्री साई पल्लवी एका सीबीआय अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. तर मल्याळम सुपरस्टार ममूटी राजकारण्याची भूमिका साकारताना दिसणार आहेत. ट्रेलरमधील त्यांच्या भूमिकेच्या झलकने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
विशेष म्हणजे, ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते नसीरुद्दीन शाह यांचीही महत्वाची भूमिका आहे. ट्रेलरमध्ये त्यांची छोटीशी झलक पाहायला मिळते. याशिवाय अभिनेत्री श्रीलीला धनुषच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे.
याआधी ‘ओम चॅप्टर १’ हा चित्रपट १६ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, याच दिवशी सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘जेलर २’ या चित्रपटाचे प्रदर्शन नियोजित असल्याने दोन्ही चित्रपटांमधील बॉक्स ऑफिसवरील टक्कर टाळण्यासाठी ‘ओम चॅप्टर १’चे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. आता हा चित्रपट २० नोव्हेंबर २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
‘अमरन’ या चित्रपटामुळे चर्चेत आलेले दिग्दर्शक राजकुमार पेरियासामी यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. तर साई अभ्यंकर यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे. वंडरबार फिल्म्स आणि आर्टेक स्टुडिओज यांच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे.
दरम्यान, धनुषच्या आगामी प्रोजेक्ट्सचीही चर्चा मनोरंजन विश्वात रंगली आहे. तो लवकरच दिग्दर्शक तामिलरसन पचामुथू यांच्या आगामी अॅक्शन चित्रपटात दिसणार असून, सध्या या चित्रपटाचे नाव ‘डी५६’ असे आहे. याशिवाय धनुषने दिग्दर्शक वेत्रिमारन यांच्यासोबत ‘तामिळ मुरुगन’ या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.



