भोर : पुणे जिल्ह्याच्या राजकीय भूगोलात शांत समजल्या जाणाऱ्या भोर नगरपालिकेच्या निवडणुकीने यंदा खळबळ उडवून दिली आहे. सन १८८५ साली स्थापन झालेल्या, तब्बल १४० वर्षांचा इतिहास असलेल्या या पालिकेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच राज्याचे दोन्ही सर्वोच्च नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, हे जाहीर सभांसाठी उतरत आहेत. यामुळे भोरच्या राजकीय वर्तुळात चांगलीच गरमी निर्माण झाली आहे. महायुती सरकारचे घटक असूनही स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदासाठी भारतीय जनता पार्टी (भाजप) आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सरळ लढत होत आहे. भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अन्य पक्ष: सहा अपक्ष, दोन शिवसेना आणि एक काँग्रेस उमेदवारही आपले नशीब आजमावत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा आज, ३० नोव्हेंबर रोजी संत गाडगे महाराज प्राथमिक शाळा मैदान येथे होणार आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा उद्या, १ डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजता जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल येथे होणार आहे. राज्याच्या सत्तेत एकत्र असणारे हे दोन्ही नेते भोरच्या जाहीर सभेत एकमेकांवर टीका करणार की, राजकीय ‘सामंजस्य’ दाखवणार, याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सभांमुळे दोन्ही पक्षांकडून विजयासाठी जोरदार मोर्चेबांधणी आणि शक्तीप्रदर्शन केले जात आहे. या निवडणुकीत भोर शहराच्या मूलभूत सुविधा (पाणी, स्वच्छता, आरोग्य, सांस्कृतिक भवन) आणि उत्रोली वडगाव औद्योगिक वसाहतीचा प्रलंबित प्रश्न कळीचा ठरला आहे. सुशिक्षित बेरोजगारांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या औद्योगिक वसाहतीच्या प्रश्नावर दोन्ही पक्षांकडून आश्वासनांची सरबत्ती केली जात आहे. ब्रिटिशकालीन वारसा भोर नगरपालिकेची स्थापना १८८५ मध्ये झाली. माजी नगराध्यक्ष कै. अमृतलाल रावळ यांनी १९६९ ते १९९३ या काळात तब्बल २४ वर्षे या पालिकेवर निर्विवाद वर्चस्व ठेवले होते. त्यानंतर १९९३ पासून या जागेवर काँग्रेसचा प्रभाव राहिला.