सातारा -जिल्ह्यात बुधवारी (दि. 3) “निसर्ग’ वादळाच्या थैमानात वीजयंत्रणेवर मोठा आघात झाला आहे. वीजयंत्रणेवर मोठी झाडे व फांद्या कोसळल्याने प्रामुख्याने जिल्ह्यातील 107 वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद पडला. परिणामी 462 गावांमध्ये सर्व वर्गवारीतील सुमारे 2 लाख 48 हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र, सायंकाळपर्यंत महावितरणचे अभियंते आणि कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर दुरुस्ती कामे करून 75 टक्के भागातील वीजपुरवठा पूर्ववत केला आहे, अशी माहिती वीज वितरण विभागाने दिली. दरम्यान, वादळामुळे महावितरणच्या वीजयंत्रणेचे शहरी व ग्रामीण भागात मोठे नुकसान झाले असून त्याबाबतची स्थिती गुरुवारी (दि. 4) सायंकाळपर्यंत स्पष्ट होईल. “निसर्ग’ वादळाच्या तडाख्याने महावितरणच्या सातारा, वडूज आणि वाई विभागामध्ये वीजयंत्रणेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तसेच या तीनही विभागांमधील 98 वीजवाहिन्यांवर झाडे व फांद्या तसेच पत्रे आदळल्याने वीजपुरवठा खंडित झाला. परिणामी 412 गावांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणचे सर्व अभियंते आणि कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरु केले. यामध्ये सायंकाळी उशिरापर्यंत वीजपुरवठा खंडित झालेल्या भागापैकी 75 टक्के भागात वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. रात्री उशिरापर्यंत उर्वरित दुर्गम व अतिदुर्गम 15 टक्के भागातील वीजपुरवठा सुरु करण्यासाठी वीजयंत्रणेची पाहणी व दुरुस्ती करण्यात येत आहे.