Power Outage – विरमाडे ते पाचवड दरम्यानच्या महामार्गालगत असलेल्या हॉटेल व रेस्टॉरंट व्यवसायांवर वीज पुरवठा वेळापत्रकाच्या नियोजनाअभावी गंभीर परिणाम होत असून या परिसरातील व्यावसायिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. दिवस- रात्र अनियमितपणे होणाऱ्या वीजेच्या लपंडावामुळे व्यवसायावर परिणाम होत असून अनेक ठिकाणी परिस्थिती ‘ठप्प’ होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. प्रवासी, ट्रक चालक व पर्यटकांवर महामार्गावरील हॉटेल्स अवलंबून असतात. मात्र, जेवणाच्या वेळेतच वीज खंडित होत असल्याने ग्राहकांना अंधारात बसावे लागते. एसी, पंखे, लाईट्स तसेच किचनमधील उपकरणे बंद पडल्याने सेवा देणे कठीण होते आणि ग्राहक तत्काळ दुसऱ्या ठिकाणी वळतात. त्यामुळे व्यावसायिकांची विश्वासार्हता आणि रोजचे उत्पन्न दोन्ही घटत असल्याचे चित्र आहे. यासोबतच, फ्रिज व डीप फ्रीजर बंद पडल्याने दूध, भाज्या, मांस यांसारख्या नाशवंत वस्तू खराब होत आहेत. दररोज हजारो रुपयांचे नुकसान सहन करावे लागत असून जनरेटर व इन्व्हर्टरसाठी अतिरिक्त खर्च वाढला आहे. महावितरण. मोठ्या हॉटेल्सना काही प्रमाणात पर्याय उपलब्ध असले तरी लहान ढाबे व रेस्टॉरंट्स सर्वाधिक अडचणीत सापडले आहेत. वीज कधी येईल आणि कधी जाईल याचा काहीच नेम नाही, असे मत व्यावसायिक व्यक्त करत आहेत. महामार्ग परिसरातील व्यावसायिकांना कोणतीही पूर्वसूचना न देता वीज खंडित केली जात असल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या पार्श्वभूमीवर, वीज वितरण कंपनी व स्थानिक प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून स्पष्ट वेळापत्रक जाहीर करावे, तसेच हायवे परिसरासाठी अखंडित वीज पुरवठा किंवा स्वतंत्र लाईनची व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी होत आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा देखील व्यावसायिकांनी दिला आहे. विरमाडे– पाचवड परिसरातील विजेची समस्या स्थानिक अर्थव्यवस्था, रोजगार आणि महामार्ग सेवा व्यवस्थेवर गंभीर परिणाम करणारी ठरत असून, वेळेत ठोस उपाय न झाल्यास परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. “एकदा ग्राहक नाराज झाला की तो परत येत नाही. त्यामुळे आमच्या व्यवसायाची प्रतिमा खराब होत आहे. काही ठिकाणी ऑनलाइन रिव्ह्यूवरही नकारात्मक परिणाम दिसून येत आहे.” – संतोष बाबर (हॉटेल व्यावसायिक) “रात्रीच्या वेळी वीज खंडित झाल्याने हॉटेल परिसर अंधारात जातो, त्यामुळे वाहनचालकांना थांबताना अडचणी निर्माण होतात आणि अपघाताचा धोका वाढतो. ही बाब केवळ व्यवसायापुरती मर्यादित न राहता प्रवाशांच्या सुरक्षिततेशीही संबंधित बनली आहे.” – अभिषेक यादव (हॉटेल व्यावसायिक)