Wai: वाई नगरपरिषदेत सत्तांतर पण शहराचे प्रश्न जैसे थे!
Wai वाईकरांनी मतदानातून दिलेला कौल हा केवळ सत्तेची खुर्ची मिळवण्यासाठी नसून शहराच्या विकासासाठी व्यक्त केलेला विश्वास आहे. या विश्वासाला कामातून न्याय मिळणार की निवडणुकीतील आश्वासने केवळ प्रचारापुरतीच होती, याचे उत्तर आता नव्या सत्ताधार्यांना आपल्या कामातून द्यावे लागणार आहे.

Wai: नगरपरिषदेच्या निवडणुकीत उमेदवारांकडून आश्वासनांची खैरात झाली. अटीतटीच्या लढती आणि प्रतिष्ठेच्या राजकीय संघर्षानंतर सत्तांतर झाले, नव्या कारभार्यांकडून शहराच्या विकासाच्या अपेक्षाही वाढल्या. मात्र निवडणुकीचा धुरळा खाली बसताच शहरातील मूलभूत प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत. अनेक प्रभागांमध्ये तुंबलेली गटारे, रस्त्याच्या कडेला पडलेला कचरा, दुर्गंधी आणि अस्वच्छतेचे चित्र कायम असल्याने सत्तांतर झाले, पण वाईकरांच्या समस्यांचे काय? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
वाई नगरपरिषदेत सत्तांतर झाल्यानंतर शहराचा कायापालट होईल, स्वच्छतेला प्राधान्य मिळेल, गटारांची नियमित साफसफाई होईल, कचरा व्यवस्थापन सुधारेल आणि नागरिकांच्या प्रलंबित समस्या मार्गी लागतील, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात अनेक भागांतील परिस्थिती पाहता या अपेक्षांची पूर्तता झालेली दिसत नाही. काही ठिकाणी गटारांमध्ये मोठ्या प्रमाणात रेती व गाळ साचला असून, सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. दुर्गंधी आणि डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या समस्यांकडे संबंधित लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे लक्ष नाही.
गटार साफ होते; मात्र कचरा रस्त्यावरच!
गटारांची साफसफाई केल्यानंतर त्यातून काढलेला गाळ आणि कचरा रस्त्याच्या कडेला टाकून दिला जात असल्याच्या तक्रारी आहेत. हा कचरा वेळेत उचलला जात नसल्याने तो पुन्हा पाण्याच्या प्रवाहातून गटारात जातो. परिणामी काही दिवसांत पुन्हा तीच गटारे तुंबतात, गटार स्वच्छ करण्याची मोहीम राबवूनही कचरा उचलण्याची जबाबदारी पार पाडली जात नसेल, तर स्वच्छतेचा नेमका उपयोग काय, असा सवाल नागरिक करत आहेत.
नगरसेवक निवडून आले; नागरिकांच्या प्रश्नांचे काय?
निवडणुकीच्या काळात मतदारांच्या दारात जाऊन विकासाची आश्वासने देणारे लोकप्रतिनिधी निवडणुकीनंतर नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी किती तत्पर आहेत, याचा आता आढावा घेण्याची वेळ आली आहे. मात्र काही प्रभागांतील अस्वच्छतेचे चित्र पाहता लोकप्रतिनिधींच्या सक्रियतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
नगराध्यक्ष सावंत यांच्यासमोर स्वच्छतेचे आव्हान
नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्यासमोर आता शहरातील स्वच्छता, गटारांची नियमित साफसफाई, कचरा व्यवस्थापन आणि नगरसेवकांच्या कामकाजात समन्वय राखण्याचे महत्त्वाचे आव्हान आहे. शहराच्या विकासासाठी केवळ बैठका, सूचना आणि नियोजन पुरेसे नसून त्याची अंमलबजावणी प्रत्येक प्रभागात दिसणे आवश्यक आहे. प्रत्येक नगरसेवकाने आपल्या प्रभागातील प्रलंबित प्रश्नांची यादी प्रशासनाकडे सादर करून त्यावर कालमर्यादेत कार्यवाही करण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. सत्तांतर झाले म्हणून शहरातील समस्या आपोआप सुटणार नाहीत. त्यासाठी लोकप्रतिनिधींची इच्छाशक्ती, प्रशासनाची कार्यतत्परता आणि कामावर सातत्यपूर्ण देखरेख आवश्यक आहे.
वाईकरांनी मतदानातून दिलेला कौल हा केवळ सत्तेची खुर्ची मिळवण्यासाठी नसून शहराच्या विकासासाठी व्यक्त केलेला विश्वास आहे. या विश्वासाला कामातून न्याय मिळणार की निवडणुकीतील आश्वासने केवळ प्रचारापुरतीच होती, याचे उत्तर आता नव्या सत्ताधार्यांना आपल्या कामातून द्यावे लागणार आहे.





