विश्वासदर्शक ठरावाच्या अगोदर शिवसेनेकडून शक्तीप्रदर्शन

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस महाविकास आघाडीला आज विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाणार आहे. विधानसभेत बहुमत चाचणीसाठी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे सर्व आमदार विधानभवनात दाखल झाले. बहुमत चाचणीआधी शिवसेनेकडून विधानभवन परिसरात शक्तीप्रदर्शन करण्यात आले. उध्दव ठाकरे यांच्यासह सर्व आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.
दरम्यान, बहुमत चाचणीपूर्वी शिवसेनेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. पक्षाच्या नेत्यांसह सर्व आमदारांनी फेटे बांधले आहेत. तर, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आम्हाला 170 पेक्षा जास्त आमदारांचे पाठबळ मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. याबाबत संजय राऊत यांनी ट्विट देखील केले आहे. तसंच आज चमत्कार होईल. आम्ही आत्मविश्वास घेऊन पुढे जात असल्याचे मत कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.
आज महाविकास आघाडीची बहुमत चाचणी होत आहे. त्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेकडून सर्व आमदारांना व्हिप काढला आहे. तर कॉंग्रेसकडूनदेखील व्हिप काढण्यात आला आहे. बहूमताच्या बाजूने आमदारांनी मतदान करण्याचे आदेश या व्हिपमध्ये करण्यात आले आहे. तर सर्व आमदारांना सभागृहात येऊन मतदान करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.





