Power Bank Blast In Flight: हैदराबादहून चंदिगढला येणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानात मंगळवारी पॉवर बँकचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेमुळे विमानात एकच खळबळ उडाली असून ५ प्रवासी जखमी झाले आहेत. सुदैवाने, विमान धावपट्टीवर असताना ही घटना घडल्याने मोठा अनर्थ टळला असून सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगोचे विमान (फ्लाईट ६ई-१०८) १९८ प्रवाशांना घेऊन हैदराबादहून चंदिगढला पोहोचले होते. दुपारी ३:२९ वाजता विमानाचे सुरक्षित लँडिंग झाले आणि विमान टॅक्सी वे वरून सरकत असतानाच ही घटना घडली. विमानाच्या ३९-सी सीटवर बसलेल्या एका प्रवाशाच्या बॅगेत असलेल्या पॉवर बँकने अचानक पेट घेतला. काही वेळातच विमानाचा केबिन भाग धुराने भरून गेला. तातडीने बचावकार्य – आगीची माहिती मिळताच क्रू मेंबर्सनी तत्परता दाखवत सर्व प्रवाशांना तातडीने विमानातून बाहेर काढले. या घटनेत जखमी झालेल्या ५ प्रवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एअरलाइन्सने दिलेल्या माहितीनुसार, विमानामध्ये दोन लहान मुले आणि सहा क्रू मेंबर्ससह एकूण १९८ प्रवासी होते. इंडिगो एअरलाइन्सचे अधिकृत स्पष्टीकरण – या घटनेनंतर इंडिगोने अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले आहे. “५ मे २०२६ रोजी हैदराबाद-चंदिगढ विमानाचे लँडिंग झाल्यानंतर एका प्रवाशाच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणात आग लागल्याची घटना घडली. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तात्काळ विमान रिकामे करण्यात आले असून सर्व अधिकारी आणि आपत्कालीन पथकांना पाचारण करण्यात आले होते. विमानाची पूर्ण तपासणी केल्याशिवाय पुढील सेवा सुरू केली जाणार नाही,” असे इंडिगोने स्पष्ट केले. प्रवाशांसाठी महत्त्वाचे: काय आहेत नवे नियम? नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) २०२६ मध्ये पॉवर बँक आणि बॅटरीबाबत कठोर नियम लागू केले आहेत. पॉवर बँक फक्त हॅन्ड लगेजमध्येच नेण्यास परवानगी आहे, ती चेक-इन बॅगेत ठेवता येत नाही. विमान प्रवासादरम्यान पॉवर बँकचा वापर करून फोन किंवा इतर उपकरणे चार्ज करण्यास सक्त मनाई आहे. अतिरिक्त बॅटरी किंवा पॉवर बँक विमानाच्या वरील कंपार्टमेंटमध्ये (Overhead Bin) ठेवता येत नाही, कारण तेथे आग लागल्यास ती विझवणे कठीण असते. या घटनेमुळे विमान प्रवासादरम्यान इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रवाशांनी सुरक्षेचे नियम पाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.