Satara News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोर्चामुळे साताऱ्यात पोवई नाका जाम
Satara News : या मोर्चादरम्यान येथील पोवई नाक्यावर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ठिय्या मारल्याने परिसरातील रस्ते ठप्प झाले. हा मोर्चा सकाळी दहा वाजता राष्ट्रवादी भवनापासून निघून जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार होता.

सातारा : वाढती महागाई, वाढलेले इंधनाचे दर, गॅस सिलिंडरची दरवाढ, राज्यात महिलांवरील वाढलेल्या अत्याचाराच्या घटना रोखण्यात महायुती सरकार अपयशी ठरले आहे, तसेच शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, नीट पेपर फुटीच्या घटनेचा निषेध यासह इतर बाबींकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी व शेतकरी आणि सर्वसामान्यांचा आक्रोश मांडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने आज येथे हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चादरम्यान येथील पोवई नाक्यावर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ठिय्या मारल्याने परिसरातील रस्ते ठप्प झाले. हा मोर्चा सकाळी दहा वाजता राष्ट्रवादी भवनापासून निघून जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार होता. त्यापूर्वी तो पोवई नाक्यावर आला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील, महिला आघाडीच्या सुवर्णा पाटील आदींच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात मोर्चात पक्षाचे पदाधिकारी, विविध सेलचे पदाधिकारी, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक सहभागी झाले आहेत.





