Chakan News : चाकण परिसरात महामार्गांवर खड्ड्यांचे साम्राज्य
Chakan News : प्रशासनाने तात्पुरती मलमपट्टी न करता दर्जेदार दुरुस्ती करावी आणि मोठे अपघात घडण्यापूर्वी रस्ते तात्काळ सुरक्षित करावेत, अशी मागणी नागरिक व कामगार वर्गाकडून केली जात आहे.

चाकण : औद्योगिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चाकण परिसरातून जाणारा पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग आणि चाकण-शिक्रापूर रस्ता पावसामुळे खड्ड्यांच्या विळख्यात सापडला आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे या दोन्ही मार्गांवर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, वाहनचालकांसाठी प्रवास अत्यंत धोकादायक बनला आहे. रस्त्यांवर पावसाचे पाणी साचल्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने किरकोळ अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
चाकण एमआयडीसीतील हजारो उद्योगांमुळे या मार्गांवरून अवजड वाहने, कंटेनर, बस आणि दुचाकींची २४ तास मोठी वर्दळ असते. मात्र, खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग मंदावून दररोज प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचे सस्पेन्शन बिघडणे, टायर फुटणे यांसारख्या यांत्रिक बिघाडांमुळे वाहनधारकांना मोठा आर्थिक फटका बसत असून इंधनाचाही अपव्यय होत आहे. प्रशासनाने तात्पुरती मलमपट्टी न करता दर्जेदार दुरुस्ती करावी आणि मोठे अपघात घडण्यापूर्वी रस्ते तात्काळ सुरक्षित करावेत, अशी मागणी नागरिक व कामगार वर्गाकडून केली जात आहे.
वाहनचालकांची मोठी कसरत
चाकण ते शिक्रापूर मार्गावर अनेक ठिकाणी डांबरीकरण पूर्णपणे उखडले आहे. खड्डे चुकवताना दुचाकीस्वारांचे वाहनावरील नियंत्रण सुटून घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. रात्रीच्या वेळी अपुऱ्या दिव्यांमुळे व पाण्याखाली लपलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका अधिक गंभीर बनत आहे.
रस्तेकामांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
दरवर्षी पावसाळ्यात या मार्गांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण होते. कोट्यवधी रुपये खर्चूनही रस्त्यांची अशी अवस्था होत असल्याने कामांच्या गुणवत्तेबाबत नागरिक प्रश्न उपस्थित करत आहेत. संबंधित विभागाने केवळ खड्डे न बुजवता निकृष्ट दर्जाच्या कामांची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.





