पुणे | पंतप्रधानांच्या वाटेवरही खड्डेच खड्डे!

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे मेट्रोची शिवाजीनगर ते स्वारगेट विस्तारित सेवेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी दि.२६ रोजी होत आहे. या एकदिवसीय दौऱ्यावर पंतप्रधान येत असले, तरी त्यांनाही पुण्यातील खड्ड्यांचा सामना करावा लागणार आहे. या रस्ते दुरुस्तीसाठी पालिकेकडे जेमतेम ४८ तास उरले आहेत.
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मेट्रो मार्गाच्या विस्तारित सेवेसह, कात्रज ते स्वारगेट मार्गाचे भूमिपूजन, भिडेवाडा स्मारकाचे भूमिपूजन तसेच राज्यातील इतर काही कार्यक्रम होणार आहेत.
पंतप्रधानांच्या या दौऱ्यांसाठी निश्चित केलेल्या मार्गात तब्बल ३५ ठिकाणी रस्त्यांवर खड्डे, फुटलेले चेंबर, उघडलेले रस्ते, पथदिवे बंद असणे, रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात राडारोडा पडलेला असणे,
गतिरोधकांची दुरवस्था, पदपथांची दुरवस्था, अनावश्यक गतिरोधक अशा प्रकारची दुरवस्था असल्याचे खुद्द वाहतूक पोलिसांनीच महापालिकेस सांगितले आहे. इतकेच नव्हे, तर त्याची यादीच पोलिसांनी महापालिकेला पाठविली आहे.
तसेच, “राष्ट्रपतींच्या दौऱ्यात रस्त्याची असलेली स्थिती पाहता त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घ्यावी,’ अशा सूचनाही या पत्राद्वारे करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुढील दोन दिवसांच्या आत महापालिकेस ही कामे पूर्ण करावी लागणार आहेत.
मेट्रोने करणार प्रवास?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणारा कार्यक्रम स. प. महाविद्यालय मैदानात होणार आहे. येथेच त्यांची जाहीर सभाही होणार आहे. मात्र, त्या पूर्वी मोदी हे मेट्रोने प्रवास करण्याचे नियोजन असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
शिवाजीनगर ते स्वारगेट हा पूर्णत: भूमिगत मार्ग असून या मार्गानेच ते शिवाजीनगरहून स्वारगेटकडे मेट्रोने प्रवास करणार आहेत. त्यानंतर स्वारगेट येथे भूमिपूजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर सभा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
बुधवारची “डेडलाइन’
रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत पोलिसांनी पत्र दिल्यानंतर महापालिका आयुक्त डाॅ. राजेंद्र भोसले यांनी सोमवारी पथ विभाग अधिकाऱ्यांसह या मार्गाची पाहणी केली.
यावेळी पोलिसांनी दिलेल्या सूचनेनुसार ही सर्व कामे बुधवारी रात्रीपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत.





