Pimpri : रावेत–निगडी मार्गाची दूरवस्था खड्डे

रावेत : रावेत–निगडी बीआरटी मार्गावरील खड्ड्यांमुळे वाहनचालक व नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. काही वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून हा रस्ता तयार करण्यात आला होता. परंतु पावसाळा सुरू होताच रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून त्यातून प्रवास करणे वाहनचालकांसाठी अक्षरशः कसरत ठरत आहे.
दररोज हजारो प्रवासी या मार्गाने निगडी, आकुर्डी, रावेत व पुण्याकडे प्रवास करतात. बीआरटी मार्ग असल्याने या रस्त्यावर बस, मालवाहतूक वाहने, दुचाकी व खासगी गाड्यांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. मात्र खड्ड्यांमुळे वाहने डांबर ऐवजी चिखल व पाण्यातून मार्ग काढत आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी खड्डे लक्षात न आल्याने दुचाकीस्वार घसरून अपघात होण्याची शक्यता अधिक आहे. अनेक लहान अपघात आधीच घडल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. बीआरटी मार्गावर बससेवेवरही या खड्ड्यांचा थेट परिणाम होत आहे. मोठे खड्डे चुकवत बसचालकांना वेग कमी करावा लागत असून, त्यामुळे प्रवासाचा वेळ दुप्पट वाढतो. प्रवाशांना धक्के बसून त्रास सहन करावा लागत आहे.
नागरिकांची मागणी
तातडीने खड्ड्यांची डांबरीकरणाद्वारे दुरुस्ती करावी.
दीर्घकालीन उपाययोजना करून बीआरटी मार्गाची पूर्णपणे पुनर्बांधणी करावी
रस्त्यावर पाण्याचा निचरा होईल अशी ती योजना करावी
बीआरटी वरील फुटपाथ/ पदपथ वर पाणी साचणार नाहीत यासाठी काळजी घेण्यात यावी
बी. आर. टी. येथील धर्मराज पूल आणि इतर ठिकाणी खडे असल्याचे निदर्शनात आल्यानंतर संबंधित कंपनीला / ठेकेदाराला सूचना देण्यात आले आहेत. सध्या पावसामुळे डांबरी (asphalt) साहित्य उपलब्ध होत नाही. त्यामुळे खड्ड्यांची दुरुस्ती व रस्त्याचे काम तात्पुरते थांबवण्यात आले आहे. मात्र पावसाळा थांबताच तातडीने सर्व कामे हाती घेतली जातील.
– बापूसाहेब गायकवाड शहर अभियंता दळणवळण विभाग पिंपरी चिंचवड महानगरपालिकारावेत–निगडी बीआरटी मार्गावर केवळ खड्डेच नाही, तर संपूर्ण व्यवस्थापन ढासळले आहे. नागरिकांच्या सुरक्षित व सोयीस्कर प्रवासासाठी उभारलेली ही यंत्रणा आज दुर्लक्ष, देखभाल अभाव व निकृष्ट कामामुळे अक्षरशः रुग्णावस्थेत पोहचेल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
– सचिन सिद्धे, नॅनो होम्स चेअरमन रावेतहा रस्ता सुरू होऊन अजून एक वर्ष पूर्ण झाले नाही. तरी रस्त्याची चाळण झाल्याचे चित्र दिसत आहे. पहिल्याच पावसात रस्त्याची जर अशी दूरवस्था असेल भविष्यात हा प्रश्न आणखी बिकट होऊ शकतो. तात्पुरती डागडुजी पेक्षा कायमस्वरूपी उपायोजना करणे अपेक्षित आहे.
– बापू कातळे, अध्यक्ष संस्थापक संकल्प सोशल फाउंडेशन





